सराईत मंगळसूत्र चोरट्यास अटक; ९ लाखांचे दागिने केले हस्तगत

Foto

छत्रपती संभाजी नगर, (सांजवार्ता ब्युरो) : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणार्‍या भामट्यास पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळून ८ लाख ७४ हजार रुपये किमतीचे ६६ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. 
याप्रकरणी पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले की, एएस क्लब परिसरात दुचाकीवरील दोन भामट्यांनी २० फेब्रुवारी रोजी पतीसोबत दुचाकीवरून जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, तर २२ फेब्रुवारी रोजी याच परिसरात एका लग्न समारंभासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील ४ तोळ्यांचे गंठण हिसकावले होते. त्यानंतर १० मार्च रोजी पुन्हा दोन भामट्यांनी सिडको वाळूज महानगरातून एका महिलेचे ११ ग्रॅम वजनाचे गंठण हिसकावले होते. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, सागर पाटील यांच्या पथकाकडून सुरू होता. दरम्यान, करमाळा पोलिसांनी मंगळसूत्र चोरीच्या घटनेत फिरोज लखन अजिज शेख (३२, रा. मुकीदपूर, नेवासा फाटा) या सराईत गुन्हेगारास अटक केली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून फिरोज यानेच वाळूज भागातून महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याचे तपासात समोर आले होते. काही दिवसांपूर्वी फिरोज जामिनावर सुटताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी फिरोजला करमाळा येथून २७ मार्च रोजी अटक केली होती. आरोपी फिरोज हा सराईत मंगळसूत्र चोर असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात १६ गुन्हे दाखल आहेत. 
पाच दिवसांची कोठडी
करमाळा येथून फिरोजला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीदरम्यान फिरोजने त्याचा साथीदार अमर कांबळे (रा. नेवासा) याच्या मदतीने तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली. त्याच्या घरातून ६६ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.