शेंद्रा येथे मांगीरबाबाच्या यात्रेला आजपासून होणार प्रारंभ

Foto
ग्रामपंचायत, देवस्थान समितीच्या वतीने जय्यत तयारी

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : शेंद्रा कमंगर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील प्रसिद्ध मांगीरबाबांच्या यात्रेला रविवार (दि.५) मध्यरात्री महाआरतीने सुरुवात होणार आहे. ही यात्रा सलग चार दिवस चालणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात उत्साहाचे वातावरण असून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

मागील पंधरवड्यापासून ग्रामपंचायत व देवस्थान समितीच्या वतीने विविध सोयी सुविधांची कामे करण्यात येत आहेत. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, वीज पुरवठा तसेच वाहतूक व्यवस्था यांचे नियोजन करण्यात आले आहे. सरपंच पुष्पा कचकुरे, उपसरपंच सर्जेराव कचकुरे, ग्रामविकास अधिकारी नामदेव चव्हाण, देवस्थान समितीचे अध्यक्ष
भास्कर कचकुरे व सचिव सुरेश नाईकवाडे हे या कामात पुढाकार घेत आहेत.

यात्रेच्या नियोजनासाठी नुकतीच शेंद्रा येथे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या
अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीस गट विकास अधिकारी मीना रायताळे, पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क राहणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीकडील विद्यमान सीसीटीव्ही कॅमेऱ्याऱ्यांसह देवस्थान समितीच्या वतीने अतिरिक्त कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

विविध ठिकाणी ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडो टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी करून पार्किंग व्यवस्थेचे काम केले आहे.