बीड : धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या बीडच्या नारायण गडावर आज मनोज जरांगे-पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. दसऱ्या मेळाव्यातील या भाषणातून मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदेसाहेब, तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये आणले आणि श्रीकांत शिंदेंकडून मला दिले असे भाजप नेत्यांना सांगितले का? याचे उत्तर तुम्ही आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत द्या, असे आव्हान देखील मनोज जरांगे यांनी दिले.
एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही माझ्याबद्दल दिल्लीत भाजपच्या लोकांना खोटं सांगितलं. कारण मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 500 कोटी पोहचले आहेत असं तुम्ही भाजपच्या नेत्यांना बोलले का?, याचं उत्तर मला एकनाथ शिंदेंनी द्यावं. दिल्लीत याबाबत भाजपचे नेते कुजबूज करत आहेत. तुम्ही मला 500 कोटी दिले का, तुम्ही जर मला दिले नसतील तर मग भाजप मला संपवते का? भाजप तुम्हाला संपवतंय?, मला आज संध्याकाळी तुमच्या दसरा मेळाव्यातून उत्तर द्या, आज नाही दिल्यास उद्या सकाळी द्या...एकनाथ शिंदेसाहेब मला याबाबत उत्तर हवं आहे. आता मी खोलात जाणार, मी छडा लावणार, असं मनोज जरांगे म्हणाले. मी जर उद्या सकाळी बोललो ना मराठ्यांनी 100 रुपये टाका. तर उद्या माझ्याकडे 2500 कोटी जमा होतील. लहान विषय नाही शिंदेसाहेब...तुमचा माझा सामना 3 महिन्यानंतर होईल, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही दिल्लीतील भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल काय सांगितलं? मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचेत आणि एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन मला दिलेत असं तुम्ही भाजपच्या नेत्याला सांगितलं का?, कारण ते नेते कुजबुज करायला लागले आहेत. मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हाताने 500 कोटी रुपये पोहोचलेत..जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आपला असं शिंदेसाहेब तुम्ही म्हणाले का???? तुम्ही मला पाचशे कोटी रुपये दिले का? तुम्ही मला जर दिले नसतील तर मग भाजप नेमकं तुम्हाला संपवतोय का तुम्ही मला संपवतात याचा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगेंचा सरकारच्या 5 हजारांच्या मदतीवरुन निशाणा
शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्यांची लढाई आपल्याला सगळ्यांना एकत्र लढायची आहे. भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी दोन महिन्यांनी भयानक परिस्थिती होणार आहे. पाणी मागितलं तर एकमेकांना द्या, एकमेकांची मजा बघू नका. मी शेतकरी संघटना, कृषी तज्ज्ञांना एकत्र बोलवतो. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत घ्यायची, अशी मागणीही जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून केली. शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले, पाच हजार. पाच हजार यांनी मदत दिली, जरी दिले तर आठ दिवस हेलपाटे घालण्यात जातील. 200 रुपये पेट्रोलचे एकूण 2 हजार जाणार, जेवणाचे 3200 रुपये जाणार, असे म्हणत जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांना देऊ केलेल्या 5000 रुपयांच्या मदतीचे गणितच मांडले. दरम्यान, जीएसटी भरायचा आपण आणि बंगले यांचे मोठे झाले. समाजावर आज संकट आलंय, मर्द असाल तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहाल. आपल्यावर वाईट संकट आलंय, असे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी 5 प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या.
दसरा मेळाव्यातून मनोज जरांगेंच्या सरकारकडे प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या.
शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा.
पिक विम्याचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.
शेतकऱ्यांचं रखडलेलं अनुदान सगळं घ्यायचं.
चारा छावण्या गावा-गावात उभ्या करा.