आता मागे हटणार नाही; शेतातच टाकली बाज !! मनोज जरांगे पाटलांचे भर उन्हात उपोषण सुरू

Foto
वडीगोद्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (३० मे) अंतरवालीत आमरण उपोषण सुरु केले आहे. सातारा संस्थानचा जीआर काढा. गॅझेटरनुसार अर्ज करणार्‍याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या, नाही दिली तर अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. आज सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी रोडवरील शेतात बाज टाकून भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.

दरम्यान आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, जितेंगे लढेंगे, हम सब जरांगे, अशा घोषणा मराठा आरक्षण समर्थकांकडून उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर देण्यात आल्या.  उपोषणानंतर लगेच शासनाच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. कालही मनोज जरांगे पाटील यांची विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली. हे उपोषण थांबवावे म्हणून या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून जरांगे पाटील यांनी केलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले ? 
या भेटीनंतर विखे पाटील यांनी नेमकं कशावर चर्चा झाली हे सांगताने ते म्हणाले, ङ्गङ्घजरांगे पाटील यांनी आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे. काल माझी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यावर आधारीत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दांबद्दल शासन स्थरावर आम्ही काय चर्चा करतोय त्याची कल्पना त्यांना दिली आहे. आणि शासनाची भूमिका स्पष्ट आहे. केवळ आश्वासन नाही तर दिलेल्या लिखीत स्वरुपाच्या मसूद्यामध्ये कारवाई १०० टक्के होईल याबद्दल साशंक असल्याचे काही कारण नाही. कारवाई बर्‍यापैकी पुढे चालली आहे. काही तृटी होत्या मी काही नाकारत नाही.

पुढे ते म्हणाले, काल त्यांच्यासमोरच काही क्षेत्रीय अधिकार्‍यांशी बोलतानाच स्पष्ट झाले की क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणे थांबली. त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. आशाही काही अधिकार्‍यांच्या संदर्भामध्ये कारवाईबद्दल सुचना दिलेल्या आहेत. मी, जरांगे पाटील यांना आपल्या सर्वांच्या वतीने, शासनाच्या वतीने विनंती करतो जी पण तुमच्या अभ्यासकांशी तुम्हाला चर्चा करायची याच्यावर अंतिम मान्यता घ्यायची आहे तर मग संध्याकाळपर्यंत कळवतील. सुधारणा असेल तर ती करता येईल. पण शासनाला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाहीये किंवा केलेले नाहीये. समाजबंधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायेत त्याबद्दल निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे.

माझी विनंती ही आहे की आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटलांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासकांशी सकाळी चर्चा होईल तोपर्यंत तरी उपोषण स्थगित करावे. की नाही करावे. परंतु आता उन्हा बसण्यापेक्षा सावलीत बसले आणि तिथेच जर आपण सगळ्या चर्चा केल्या, त्यात त्यांचे समाधान झाले. त्यांच्या सुचनांवर आम्ही कारवाई केली किंवा करु शकलो नाही तर मग आंदोलनाचा मार्ग तर मोकळा आहेच. तोपर्यंत तरी त्यांनी आमची विनंती मान्य करावी. तब्बेतही चांगली नाहीये. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा आता याबाबतीमध्ये सहानभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा विचार करावा असे ते म्हणाले.


आता मनोज जरांगे यांच्या मागण्या काय आहेत? 
१) मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. (कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास ते ओबीसी प्रवर्गातून लाभ घेऊ शकतील.)
२) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थानांचा जीआर काढावा. १९९४ च्या धर्तीवरच जीआर काढण्यात यावा. 
३) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत. 
४) आंदोलन आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारांच्या कुटुंबियांना महावितरण, एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याबद्दल शासन निर्णय काढण्यात यावा. 
५) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्यात याव्या. 
६) महामंडळाचे सर्व परतावे तात्काळ वाटप करण्यात यावेत. 
७) कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, त्याची व्हॅलिडीटी देण्यात यावी. 
८) मराठा उपसमिती कामाची नाही. अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. 
९) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करण्यात यावे. 
१०) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला सांगण्यात यावे. 
मनोज जरांगे पाटील हे या दहा मागण्यांसाठी आजपासून उपोषणला बसत आहेत. अंतरवाली सराटीमध्ये ते अन्न त्याग करून उपोषण सुरू करणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठिक-ठिकाणी मराठा आरक्षण मागणीचे समर्थक आंदोलन करणार आहेत. 
 
माझा संघर्ष प्रामाणिक आहे
उपोषणाला सुरूवात करण्यापूर्वी मनोज जरांगे म्हणाले की, माझा संघर्ष प्रामाणिक आहे. सरकारे येतील-जातील, मी उपोषणावर ठाम आहे. ५८ लाख नोंदी धारकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. मुख्यमंत्री फडणवीसांनी न्याय देण्याच्या भूमिकेत यावे. एकदा याच ठिकाणी आम्ही आमच्या आई-बहिणींना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले आहे. पुन्हा असा विचार करू नका. लाठीचार्जच्या भानगडीत पडू नका. आडवं बोलत नाही. सरकारला पट्ट्यावर घेत नाही आणि आता आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.