जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषणाच्या 15 व्या दिवशी मुंबईला जाण्याची घोषणा केली. मुंबईला जाताना मराठ्यांना मान खाली घालायला लावू नका, असं म्हटलं. यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जाण्यासाठीचा मार्ग जाहीर केला आहे. अंतरवालीतून मुंबईला जाताना पोलीस आणि गृहमंत्र्यांनी आम्हाला अडवू नये, असं आवाहन जरांगे पाटील केलं. पोलिसांनी अडवल्यास जिथं अडवतील तिथं शांतपणे बसून राहण्याचं आवाहन केलं.
मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा मार्ग
आपला पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोद्यात होणार आहे. दुसरा मुक्काम अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यात होणार आहे. तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसरमध्ये होणार आहे. पुण्यातून कोणत्याही रस्त्यानं गेल्यानं मुंबईला जावं लागतं. चौथा मुक्काम खोपोलीमध्ये होणार आहे, ते रायगड जिल्ह्यात आहे. खोपोली किंवा कोपरखैरणे यात चर्चा सुरु आहे. मात्र, खोपोली फायनल धरा, त्यानंतर आझाद मैदानात आमरण उपोषण केलं जाईल.
पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आहे, तिथल्या सगळ्या मराठ्यांनी कामाला लागावं.श्रीगोंदा तालुक्यातील सगळ्या मराठा समाजानं, हडपसर आणि पुणे शहर पूर्ण यांनी सगळ्यांनी हडपसरच्या तयारीला लागावं. रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईतील खोपोली आणि कोपरखैरणे येथील बांधवांनी कामाला लागावं. पाचव्या दिवशी सकाळी 10 वाजता आझाद मैदानला आमरण उपोषण सुरु करतोय.
मराठा समाजानं आशीर्वाद देण्यासाठी यावं
आपण ज्या मार्गानं जाणार आहे त्या मार्गावर म्हणजेच अंतरवाली- शहागड- गेवराई -बीड-मांजरसुभा- लिंबा गणेश मार्गे पाटोदा या रस्त्यावरुन जे मराठा बांधव मुंबईसाठी चाललेत ते मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी चालले आहेत. आम्ही ज्या रस्त्यावरुन मुंबईला चाललोय, त्या मार्गावर जे मुंबईला येणार नाहीत त्यांनी आशीर्वाद द्यायला, वाटेला लावण्यासाठी यावं. समाजासाठी एक दिवस काढून आम्हाला आशीर्वाद देऊन माघारी घरी जावं. जी तारीख सांगणारे त्या तारखेला रस्त्यावर या. जी तारीख सांगितली त्या तारखेला काम बंद, नोकरी व्यवसाय बंद, तुमच्या अंगात मराठ्यांचं रक्त खेळतंय असं वागा.चिखलानं पाय भरले असले तरी शेतातून पळत या, आम्ही चाललेल्या मार्गावर आपल्या मुंबईला जाणाऱ्या लेकराला आशीर्वाद द्यायला रस्त्यावर या, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
पोलीस आणि गृहमंत्र्यांनी आम्हाला अडवू नये
मुंबईला बेमुदत आमरण उपोषण चालणार आहे, जे कायमस्वरुपी आंदोलनाला येणार आहेत, रॅलीत येणार आहेत, आपण सगळ्यांनी एकाच मार्गानं चालायचं आहे. कायमस्वरुपी जे मुंबईसाठी येणार आहेत त्यांनी ओव्हरटेक करायचं नाही, सांगितलेले शब्द विसरायचे नाहीत. शांततेनं मुंबईला जायचं आहे. कोणाला धक्का लागू नये, कट लागू नये, इजा होऊ नये. आपण जो मार्ग ठरवला आहे त्या मार्गानं सगळ्यांनी सोबत जायचं आहे. आपल्याला शांततेच्या मार्गानं आंदोलन करायचं आहे.
पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही बॅरिकेड टाकून अडवायचं नाही.आम्हाला लोकशाही मार्गानं शांततेत उपोषण करायचं आहे. लोकशाही मार्गानं शांततेत आमरण उपोषण करुन आम्हाला आमचा हक्क मिळवायचा आहे. मग तुम्ही अडवता कशामुळं तुम्हाला राज्य अस्थिर करायचं आहे काय? अडवलंच तर शांततेत बसून राहायचं, लांबलचक डांबरावर झोपायचं, बॅरिकेड लोटायचं नाही.