जालना : मरेन पण मी मागे हटणार नाही, डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही. मी क्षत्रिय मराठा आहे, कोणापुढे गुडघे टेकून शरण जाणार नाही. माझ्या समाजाच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी वेळप्रसंगी मी मरेन, पण समाजाचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा इंचभरही कमी होऊ देणार नाही. ही कदाचित माझी शेवटची झुंज किंवा शेवटची भेट असू शकते, पण मराठ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ताठ मानेने आणि जातीनं लढले पाहिजे, असे भावनिक आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
ताकद मुंबईसाठीच राखीव ठेवायची आहे
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उद्या 15 सप्टेंबरला सकाळी ११ वाजता मी अंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने ठरलेल्या मार्गाने निघणार आहे. माझ्यासोबत जास्तीत जास्त दोन गाड्या आणि दोन ॲम्ब्युलन्स असतील, 5 ते 10 माणसांपेक्षा जास्त कोणी सोबत असणार नाही. त्यांनी सांगितले की, मराठा समाजाने सध्या मुंबईला येऊ नये. तुम्ही गावागावात ज्या गाड्या लावल्या आहेत आणि ज्या वर्गण्या केल्या आहेत, त्या तशाच ठेवा. त्यातील एक रुपयाही खर्च करू नका. उलट आता वेळ मिळाला आहे, तर 5 गाड्यांच्या जागी 7 आणि 10 गाड्यांच्या जागी 12 कशा करता येतील याचा प्रयत्न करून ताकद वाढवा. ही सर्व फौज आणि ताकद मुंबईसाठीच राखीव ठेवायची आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या डावावर प्रती-डाव
त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी सणावाराच्या आड लपून मराठ्यांवर वार केला आहे. मराठ्यांनी मुंबईत येऊन धिंगाणा करावा आणि मराठ्यांना दंगलीचा डाग लागावा, असा त्यांचा डाव होता. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी मी एकटा पुढे चाललो आहे. रस्त्यातील सगळे काटे मला काढू द्या म्हणजे तुम्हाला टोचणार नाहीत. आता मी एकटा जात असल्याने देवेंद्र फडणवीस कोणती परवानगी नाकारणार? आणि आता जर नाकारली, तर करोडो मराठे बेकायदा बिनापरवानगीचे मुंबईत शिरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांनी, महिलांनी आणि वृद्धांनी आपल्या गावात, तालुक्यात किंवा शहरात ग्रामपंचायतीसमोर शांततेत फेऱ्या व रॅली काढून या आंदोलनाला पाठिंबा चालू ठेवावा. महिलांनीही आपली ताकद वाढवत राहावी, मुंबईत कधी निघायचे याची तारीख दोन दिवस आधी सांगितली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आशीर्वाद द्यायला रस्त्यावर या, मुंबईला येऊ नका....
माझ्या उपोषणाचा आजचा 17 वा दिवस आहे. आता सलाईनही न लावल्यामुळे पोटात पुन्हा आग पडली आहे. मी मुंबईला एकटा जाणार आहे. चार-पाच सहकारी माझ्यासोबत असतील. मला उठून उभे राहता येत नाही. त्यामुळे रस्त्यात सत्काराचे नियोजन करु नका. मला बोलता आलं तर भाषण करेन. पण मला भेटायला येण्यावर बंध नाही. ही शक्यतो शेवटची भेट असेल. त्यामुळे आशीर्वाद द्यायला रस्त्यावर या, पण मुंबईला येऊ नका. शक्यतो ही माझी गोदा पट्ट्याशी आणि महाराष्ट्राशी शेवटची भेट असू शकते, अशी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला घातली. ते सोमवारी अंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
आपल्याला मराठा समाजाला हरुन द्यायचे नाही. जिथे देह टेकेन तिथे टेकेन. पण मराठ्यांनी मिश्यांवर ताव मारला पाहिजे इतकं जातिवंत लढायचं. समाजातील लेकरांची मान उंचावली पाहिजे, मेला पण हटला नाही, असे म्हटले पाहिजे. मला असं खितपत पडून मला मरायचं नाही, समाजाला देऊन मरायचं आहे. समाजाची प्रतिष्ठा इंचभरही ढळून द्यायची नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. मी फक्त माझ्याबद्दल नाही तर सगळ्या मराठ्यांबद्दल सांगतो, प्रत्येक घरातील म्हातारा माणूस अभिमानाने म्हणाला पाहिजे, 'असं पोरगं मराठ्यांच्या पोटी जन्माला येते.शेवटच्या श्वासापर्यंत तोंडात हाच शब्द होता, माझ्या समाजाच्या लेकराबाळाला आरक्षण द्या. पळून नाही गेला, छातीवर गोळ्या घेतल्या, पण हलला नाही. पैदा व्हावं तर असं पोरगं व्हावं, अशा भावनिक संवाद जरांगे पाटील यांनी अंतरवालीतील मराठ्यांशी साधला.