अनेक राजकीय नेत्यांचे जय बाबाजी, शांतीगिरी महाराजांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी

Foto

औरंगाबाद- लोकसभेची निवडणूक अवघ्या सहा महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विविध पक्ष संघटनांमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे. या गडाला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात वेरुळ येथील मौनगिरी शांतीगिरी महाराज यांचे नाव सध्या लोकसभा निवडणुकीपुढे येऊ लागले. त्या पार्श्‍वभूमीवर विविध पक्ष संघटनांतील प्रमुख नेत्यांनी बाबाजींच्या भेटी घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सध्या तरी बाबाजींच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

 

जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्‍वर शांतीगिरी महाराजांनी २००९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी लाख ६२ हजार मते मिळविली होती. त्यामुळे बाबाजींचे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्व वाढले आहे. बाबाजींच्या भक्‍तगणाची शक्‍ती लक्षात घेऊन विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरापासून बाबाजींच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेण्यावर भर दिला आहे असे दिसून येते. वर्षभरात बाबाजी विविध धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात अनेक वेळा गेले. यावेळी अनेक राजकीय पुढार्‍यांनी बाबाजींच्या कार्यक्रमस्थळी तर काहींनी  वेरुळ आश्रमातजाऊन भेटी घेतल्या. त्यामुळे चर्चेला उधान आले आहे. 

 

वर्षभरात बाबाजींच्या भेटी घेणार्‍यांमध्ये प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार हर्षवर्धन पाटील, प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, माजी खासदार उत्तमसिंह पवार, आमदार अतुल सावे, आ. प्रशांत बंब, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आ. हर्षवर्धन जाधव या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. तर बाबाजी गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशला दोन वेळा गेले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. नुकतीच पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी आश्रमात जाऊन बाबाजींची भेट घेतली आहे. 

 

बाबाजींच्या निर्णयाकडे लक्ष 


शांतीगिरी महाराजांनी लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्या भक्तगणांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी बाबाजींच्या भेटी घेतल्या असल्या तरी बाबाजींनी अजून तरी निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार हे गुपीत ठेवले आहे. त्यामुळे बाबाजी काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.