मराठवाडा पाण्याखाली

Foto
कृषिमंत्री दौर्‍यावर : महसूल विभागाचे पंचनामे सुरू
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने मराठवाडा पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीच्या दुष्टचक्रात अडकला आहे. दुर्दैवाने गतवर्षीही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच अवकाळी पावसाने विभागातील खरीप पिके नेस्तनाबूत केली होती. यावर्षीही पुन्हा एकदा निसर्ग कोपल्याने अख्खा मराठवाडा अतिवृष्टीच्या छायेत आहे. कृषी मंत्री दादा भुसे आज जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून अतिवृष्टीने खराब झालेल्या पिकांची पाहणी करीत आहेत. 
दुसरीकडे महसूल विभागानेही पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत.
निसर्ग राजाने पहिले तीन महिने चांगला वर्षाव केल्याने सुखावलेला शेतकरी ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यापासून रडकुंडीला आला. सप्टेंबर महिन्यातही पावसाचे धो धो बरसने सुरूच राहिल्याने आता तर पिके पाण्यात बुडाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात भीषण परिस्थिती आहे. 
जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 222 टक्के पाऊस पडला. त्यामुळे पैठण, वैजापूर, सिल्‍लोड, गंगापूर, सोयगाव, औरंगाबाद, फुलंब्री यासह सर्वच तालुके अतिवृष्टीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. पाचोड परिसरात काल कोसळलेल्या पावसाने हाहाकार उडवला. शेतकर्‍यांच्या शेतात तब्बल कमरे एवढे पाणी साचले होते. मोसंबी, डाळिंब, आंबा यासह इतर फळबागा पाण्यात डुबल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात तुफान पाऊस पडला. गेवराई 87 मिलिमीटर, गेवराई धोंदराई 89, गेवराई चकलांबा 72, शिरूर कासार 70 या परिसरात अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड 66, देगलूर मानेगाव 66, नायगाव 65, नायगाव कुंटूर 65, नायगाव नाशिक 65, नायगाव मंजीराम 90, तर परभणी जिल्ह्यात 71 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
दरम्यान राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचे आज सकाळी जिल्ह्यात आगमन झाले. कन्‍नड तालुक्यातील पिकांची पाहणी करून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. दुसरीकडे महसूल विभागानेही अतिवृष्टीचे पंचनामे सुरू केले आहेत. शासनाच्या आदेशानुसार 33 टक्के नुकसान झालेल्या पिकांना तातडीची मदत देण्यात येणार आहे.
11 मंडळात अतिवृष्टी!
 काल शुक्रवारी गेल्या चोवीस तासात औरंगाबाद जिल्ह्यातील अकरा मंडळात अतिवृष्टी झाली. पैठणला 138, कांचनवाडी 135 तर विहामांडवा परिसरात तब्बल 130 मिलिमीटर पाऊस कोसळला. भावसिंगपुरा मंडळात 118 मिलिमीटर, पैठण तालुक्यातील नांदूर 106, बालानगर 97, पिंपळवाडी 82, आडूळ 68, बिडकीन 70 तर गंगापुर तालुक्यातील वाळुजला 87 मिलिमीटर पाऊस झाला. शहरातील उस्मानपुरा मंडळातही 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker