‘अगं ये चिमणे हे बघ आणलाय मोत्याचा दाणा’

Foto
’ चिव चिव चिमणे , अगं ये चिमणे
  काय रे चिमण्या
हे बघ आणलाय मोत्याचा दाणा
बघु बघु बघु पण ठेवायचा कुठे ’ ?

या गाण्यांच्या ओळी आपण अनेकदा ऐकलेल्या आहेत. लहान मुलांना घास भरवतांना ’ हा घास चिऊचा ’ अस आपण म्हणतोच. परंतु आज या गाण्यातली चिमणाताई नजरेच्या आड झाली आहे. त्यामुळे चिमणी वाचवा’ या चळवळीसाठी 20 मार्च हा दिवस जगभरात ’चिमणी दिन’ म्हणून पाळण्यात येतो.
एक टुमदार घर , घरासमोर हिरवा गालिचा अंथरलेल्या सारखी बाग, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी नुकतीच पसरायला सुरुवात केलेली , फुलांवर टपोरे दवबिंदू आणि आंब्याच्या झाडावर घरट्यातून बाहेर येत चिवचिवाट करणार्‍या चिव चिव चिमण्या. खरेतर हे दृश्य आता शहरात तरी पाहायला मिळत नाही . त्यामुळे आजच्या पिढीला ’ चिमणी ’ हि केवळ टेलिव्हिजनवरच पाहायला मिळते.
सिमेंटच्या जंगलामुळे तसेच शहरातील मोबाइल टॉवर्समुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. शहरात तर चिमण्यांची चिव चिव देखील ऐकावयास मिळत नाही.
पूर्वी सुंदर सकाळी आणि रम्य अशा संध्याकाळी सुद्धा चिमण्यांचा चिवचिवाट माणसाला निसर्गाच्या जवळ नेत असे.काही वर्षांपूर्वी घरातील महिलांनी अंगणात वाळत घातलेले धान्य चिमण्या आणि इतर पाखरांनी टिपू नये म्हणून हातात काठी घेऊन त्याचे राखण केले जायचे आणि आज त्याच चिमण्यांच्या संवर्धनासाठी जागतिक चिमणी दिन साजरा करण्याची वेळ माणसांवर आली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्या व इतर पक्ष्यांची संख्या घटणे हा चिंताजनक विषय आहे.ग्रामीण आणि शहरी भागांमध्येहि मोठ्या प्रमाणात होणारी झाडांची कत्तल, त्या जागेंवर उभ्या राहणार्‍या मोठमोठ्या इमारती, घरे यांमुळे चिमण्यांची संख्या घटण्यास सुरुवात झाली. तसेच माणसाची अत्यावश्यक गरज म्हणजे मोबाईल फोन व या फोन्सचे टॉवर्स यातून निघणार्‍या हानिकारक किरणांमुळे,विद्युत् चुंबकीय उत्सर्जनामुळे चिमण्यांना नुकसान पोहोचू लागले. अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.त्या शहरातून जणू हद्दपारच झाल्या. आजचा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो.या चिऊताईला आज प्रत्येक जण म्हणत आहे,
 ओ री चिरैय्या नन्ही सी चिडिया
अंगणामे फिर आजा रे ,
किरणोके तिनके , अंबरसे चुनके
अंगणामे फिर आजा रे .

गेल्या पाच वर्षांमध्ये चिमण्यांची संख्या हळूहळू वाढतांना दिसत आहे. आपल्या औरंगाबादमध्ये गोगाबाबा, दर्गा परिसर, पिसा देवी, खंडोबा याठिकाणी चिमण्या दिसतात. पर्यावरणात चिमण्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आजच्या दिवशी चिमणी जगवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करायला हवे. जसे आपल्या गच्चीवर चिऊताईसाठी दाणा - पाणी ठेवावे. वृक्ष संवर्धन करावे जेणेकरून चिमणीला घरटे बांधण्यासाठी झाडे शिल्लक राहतील.
- दिलीप यार्दी, पक्षिमित्र

आजच्या या चिऊदिनी सांजवार्ता वाचकांना आवाहन करते कि, आज जिथे दररोज एक वृक्ष तोडले जात आहे तिथे आपल्या पुढच्या पिढीला हि चिवचिव करणारी चिऊताई दिसावी यासाठी आज एक वृक्ष लागवड करुया, तसेच प्रत्येकाने आपल्या गच्चीवर, गॅलरीत चिमणाताईसाठी दाणा - पाणी ठेवावे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker