उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह सराफा बाजाराचेही लक्ष दरांच्या हालचालींकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले सोन्याचे दर आता १ लाख ३० हजार रुपये तोळ्यावर, तर चांदीचे दर एक लाख ६५ हजार रुपये किलोवर आले आहेत. यापूर्वी सोन्याचे दर १ लाख ४५ हजार रुपये, तर चांदीचे दर २ लाख २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. परंतु दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहक आणखी प्रतीक्षेत आहे. त्यामुळे दर स्थिर झाल्यानंतरच खरेदी वाढेल अशी अपेक्षा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना व्यक्त केली आहे.
सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे गेल्या काही महिन्यांपासून दागिन्यांची खरेदी करताना ग्राहकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. लग्नकार्य, साखरपुडा तसेच इतर शुभकार्यांसाठी सोन्याचे दागिने खरेदी करणे अनेकांसाठी खर्चिक ठरत होते. मात्र, आता सोन्याच्या दरात सुमारे १५ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ६० हजार रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विशेषतः आगामी लग्नसराई लक्षात घेता सोन्याचे दर कमी झाल्याचा फायदा अनेक कुटुंबांना होऊ शकतो.
ग्राहक थांबले; सराफा मार्केटमध्ये खरेदी थांबली
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी सराफा बाजारात अपेक्षित खरेदी होताना दिसत नाही. दर कमी झाल्यानंतर ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाहेर पडतील, अशी अपेक्षा व्यापार्यांना होती. मात्र, सध्या ग्राहक सावध भूमिका घेत आहेत. सोन्याचे दर आणखी कमी होईल का? याकडे ग्राहक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे अनेकांनी खरेदीचा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ असली तरी प्रत्यक्ष दागिने खरेदीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांतील दरातील घसरण पाहता आणखी काही दिवस थांबल्यास सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात, अशी अपेक्षा ग्राहकांना आहे. त्यामुळे लग्नासाठी आवश्यक असलेले दागिने खरेदी करण्यासाठीही अनेक कुटुंबे सध्या प्रतीक्षा करत आहेत. विशेषतः मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदी करायचे असलेल्या ग्राहकांकडून दर स्थिर होण्याची वाट पाहिली जात आहे.
यामुळे दर घसरले
आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचाही सोन्या-चांदीच्या बाजारावर परिणाम होत आहे. अमेरिकेतील व्याजदरविषयक धोरण आणि बँकांमधील आकर्षक परताव्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांचा कल बँकांमधील ठेवी तसेच शेअर बाजाराकडे वाढत असल्याचे चित्र आहे. परिणामी, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वळणार्या गुंतवणूकदारांचे प्रमाण कमी झाल्यास सोन्याच्या मागणीवर परिणाम होतो. मागणी कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. त्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारातही दिसून येत आहे. सोन्याचे दर कमी होत असल्याने सराफा बाजारातील व्यवहारांवरही त्याचा परिणाम झाला आहे. ग्राहक सध्या मोठ्या खरेदीऐवजी परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. दरात सतत चढ-उतार होत असल्याने व्यापार्यांनाही व्यवसायाचे नियोजन करताना अडचणी येत आहेत.