कौटुंबिक संकटाच्या भीतीने विवाहितेची फसवणूक

Foto
भोंदू बाबाच्या टोळीतील दोन संशयितांना अटक 

गंगापूर, (प्रतिनिधी) : संकटे दूर करण्याचे आणि पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याची खोटी भीती दाखवून एका भोंदू बाबाने विवाहितेची पाच लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवत अवघ्या वीस दिवसांत दोन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.

सोनाली तागड (वय २६, रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर, ह.मु. भेंडाळा फाटा, ता. गंगापूर) या विवाहितेची व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे कमलाकर जोशी (वय ५०, रा. गाणगापूर, कर्नाटक) याच्याशी ओळख झाली होती. जोशी व त्याच्या साथीदारांनी महिलेला विविध प्रकारची भीती दाखवून तिच्याकडून रोख रक्कम, फोन पे आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख रुपयांचा गंडा घातला.

याप्रकरणी विवाहितेने ६ जून रोजी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून तपास
सुरू केला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे फसवणुकीतील संशयित आरोपी बादल गणेश एखंडे (वय २६, रा. वाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव) याला छत्रपती संभाजीनगर येथील बाबा पेट्रोल पंपाजवळून ताब्यात घेतले.

 तर त्याचा दुसरा साथीदार सागर सूर्यभान गंगावणे (वय २७, रा. अष्टविनायकनगर, नवीन मोंढा, जालना) याला जालन्यातून अटक केली. रविवारी (ता. २८) या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १० हजारांची रोकड हस्तगत केली आहे.