लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर केला अत्याचार

Foto


छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण एमआयडीसी वाळूज पोलिसांकडे वर्ग केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रेहान मोहम्मद शेख (रा. हनुमान नगर, रांजणगाव) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीपासून विभक्त राहणार्‍या अमरावती येथील ३० वर्षीय विवाहितेची एप्रिल २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवरून रांजणगाव (ता. गंगापूर) येथील रेहान मोहम्मद शेख याच्याशी ओळख झाली. सोशल मीडियावरील ही ओळख पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधात रूपांतरित झाली. १९ मे २०२५ला आरोपीच्या बोलावण्यावरून पीडिता अमरावतीहून ट्रॅव्हल्सने छत्रपती संभाजीनगर येथे आली. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते.
गर्भपातास न केल्यास जिवे मारण्याची धमकी
दरम्यान, या संबंधातून पीडिता सध्या साडेपाच महिन्यांची गर्भवती झाली आहे. यानंतर तिने आरोपीकडे लग्न करण्याचा तगादा लावला असता आरोपीने लग्नास नकार देत गर्भपात केला नाही तर जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. या ठिकाणी तिला सुरक्षित न वाटल्याने तिने अमरावती येथे जाऊन तक्रार दिली. दरम्यान, पीडितेने सहायक पोलिस आयुक्त डॉ. भागीरथी पवार तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.