देशभरात ३० हजार कोटींचा महाघोटाळा! ड्रायव्हर-नोकराच्या नावे बनावट कंपन्या; ईडीची धडक कारवाई

Foto
नवी दिल्ली  : देशभरात  पसरवलेल्या आणि सुरक्षा यंत्रणांची झोप उडवणार्‍या एका मोठ्या सायबर टोळीचा आणि डिजिटल अरेस्टच्या रॅकेटचा ईडीने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान तब्बल ३०,००० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी ईडीने मुंबईतून फहीम मोईन हुसेन सय्यद आणि नईम मुईन सय्यद या दोघांना अटक केली आहे.

गोव्यातील एका महिलेला सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून मे ते जून २०२५ दरम्यान २.६० कोटी रुपये स्वतःच्या बनावट सीक्रेट सुपरव्हिजन अकाउंट्समध्ये टाकण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी गोव्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत तपास सुरू केला. मुंबईतील विशेष न्यायालयाने आरोपींना गोव्यातील पणजी येथे घेऊन जाण्यासाठी ट्रांझिट रिमांड मंजूर केली आहे.

असे चालायचे कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे जाळे
तपासानुसार, पीडित व्यक्तींकडून उकळलेली रक्कम आधी वेगवेगळ्या बँक खात्यांत जमा केली जायची. त्यानंतर ती रोख स्वरूपात काढून रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या मनी चेंजर्सद्वारे परदेशी चलनात बदलली जात होती.

या प्रकरणात एकूण २७,००० कोटींचे बँक व्यवहार आणि ३,००० कोटींचे रोख व्यवहार आढळून आले. २० राज्यांत ही फसवणूक झाली असून ३०० हून अधिक तक्रारी आणि १५० एफआयआर दाखल झाले आहेत.

ड्रायव्हर अन् नोकर बनले बनावट कंपन्यांचे संचालक

या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर शेल कंपन्यांचा वापर करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे, एकाच घरात राहणारे ड्रायव्हर आणि छोटे-मोठे कर्मचारी या कंपन्यांचे संचालक म्हणून दाखवण्यात आले होते.