नागपूर : काटोल तालुक्याती राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या एक्स्प्लोजिव्ह कंपनीत स्फोट झाला असून त्यात 17 कामगारांचा मृत्यू झाला. तर 18 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राऊळगावजवळील येनवरा येथे एसबीएल एनर्जीचे युनिट आहे. तेथे विविध डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सिजमिक एक्स्प्लोसिव्ह्सचे उत्पादन होते. त्यातीलच एका युनिटमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यावेळी 30 हून अधिक कर्मचारी विविध युनिटमध्ये काम करत होते. स्फोटाचे आवाज आजूबाजूच्या गावांमध्येदेखील ऐकू आले. त्यामुळे अनेक जण घराबाहेर आले. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.
यात 18 हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपुरकडे हलविण्यात आले आहे. काही कामगार मलब्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. यात नेमकी किती प्राणहानी झाली याचा आकडा समोर आलेला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाचहून अधिक कामगार मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि यात कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ट्विट द्वारे माहिती दिली की, ते स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी तळ ठोकून आहेत. आणि ची पथके तातडीने मदतकार्यासाठी पोहोचली आहेत.
पेसो आणि डिश या तांत्रिक तपासणी करणाऱ्या विभागांची पथकेही घटनास्थळी दाखल झाली असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू झाले आहे.
18 जण जखमी; उपचारासाठी नागपूरला हलवले
या भीषण दुर्घटनेत 18 जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.