गंगापूर शहरात राजीव गांधी चौकात फुटवेअर दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Foto
गंगापूर (प्रतिनिधी) : गंगापूर शहरातील खंडोबा मंदिराजवळील ऐश्वर्या कॉम्प्लेक्समध्ये ३१आक्टोबंर रोज बुधवारी रात्री ८:१५ वाजता भीषण आग लागून राधाकृष्ण फुटवेअर हे दुकान जळून खाक झाले. या आगीत दुकानातील सर्व मालसामान व फर्निचर पूर्णतः नष्ट झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय जाधव यांच्या मालकीच्या या कॉम्प्लेक्समध्ये तळमजल्यावर तीन व वरच्या मजल्यावर दोन दुकाने आहेत. तळमजल्यावरील रविंद्र विठलराव उदमले यांच्या राधाकृष्ण फुटवेअर दुकानात रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली.

दरम्यान, पावसामुळे ग्राहक कमी असल्याने उदमले यांनी दुकान आठ वाजताच बंद केले होते. त्यावेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र काही वेळाने वीज आल्यानंतर अचानक शॉर्टसर्किट होऊन “फट” असा मोठा आवाज झाला आणि क्षणात आग पसरली, अशी माहिती शेजारील दुकानदारांनी दिली. आग लागल्याचे समजताच शेजाऱ्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. माजी नगराध्यक्ष जाधव यांनी खाजगी टँकर बोलावला, परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अखेर अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.

आगीमुळे संपूर्ण दुकान राखेत परिवर्तित झाले, मात्र शेजारील फर्निचर व सलून दुकाने अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली.  गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंह राठोड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग पूर्णपणे विझवण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.