मुझफ्फरपूर : बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी बातमी समोर आली आहे. येथील ब्रह्मपुरा भागात असलेल्या प्रसाद हॉस्पिटलला रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की त्यांनी काही वेळातच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला पूर्णपणे कचाट्यात घेतले. या भीषण दुर्घटनेत रुग्णालयात दाखल असलेले दोन डझनहून अधिक रुग्ण थेट होरपळले असून, प्राथमिक माहितीनुसार यामध्ये १० रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, मृतांच्या अधिकृत आकड्याबाबत अद्याप प्रशासनाकडून अंतिम पुष्टी मिळणे बाकी आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
रुग्णालयाच्या इमारतीला लागलेल्या या आगीचे प्राथमिक कारण विजेचे शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या आगीमागचे नेमके आणि वास्तविक तांत्रिक कारण काय होते, हे सविस्तर तपासणीनंतरच स्पष्ट होईल. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास आयसीयूमधून अचानक धूर आणि आगीच्या लहरी उठू लागल्या. हे पाहताच संपूर्ण रुग्णालयात एकच गोंधळ उडाला आणि रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. घटनेची भीषणता पाहता रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत आयसीयूच्या खिडक्या तोडल्या आणि रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू केले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
रुग्णांना इतर रुग्णालयात केले शिफ्ट
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तातडीने फौजफाट्यासह प्रसाद हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अधिकार्यांनी स्वतः उपस्थित राहून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत होरपळलेल्या सर्व रुग्णांना तातडीने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अग्निकांडात प्राण गमावलेल्या दुर्दैवी रुग्णांची आणि गंभीर जखमींची ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. यासोबतच, पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाची टीम आयसीयूमध्ये झालेल्या एकूण जीवित आणि वित्तहानीचा अचूक अंदाज घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहाटे ३ वाजता लागली आग
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आयसीयू वार्डात अचानक आग लागली. काही सेकंदांतच संपूर्ण वार्डात काळाकुट्ट धूर पसरला. आग लागल्याचे समजताच रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. परंतु, संकट समयी मदतीला धावून जाण्याऐवजी रुग्णालयातील जबाबदार कर्मचार्यांनी स्वतःचा जीव वाचवून तिथून पळ काढला. अग्निशामक दलाचे अधिकारी आर. एन. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तिथे रुग्णालयाचा एकही अधिकृत कर्मचारी उपस्थित नव्हता. परिस्थिती अत्यंत भयावह आणि नियंत्रणाबाहेर गेली होती.
क्षमता १३ रुग्णांची, कोंबले १५ रुग्ण; सुरक्षेचे नियम धाब्यावर
या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी सुब्रत कुमार सेन यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, रुग्णालय प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा उघडकीस आला. ज्या आयसीयू वार्डची क्षमता केवळ १३ बेडची होती, तिथे नियमांचे उल्लंघन करून १५ रुग्णांना भरती करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, आग लागली तेव्हा आयसीयूचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद होता. त्यामुळे धुराचे लोट पसरल्यावरही रुग्णांना बाहेर पडता आले नाही आणि गुदमरून ३ निष्पाप जीवांचा अंत झाला. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, आयसीयूचे वॉर्ड इंचार्जही यात गंभीर भाजले असून त्यांच्यावर शेजारच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माझ्या वडिलांचा मृतदेह तरी द्या... नातेवाईकांचा आक्रोश
ङ्गङ्घआग लागली तेव्हा संपूर्ण स्टाफ पळून गेला. माझे वडील आत अडकले होते, पण त्यांना वाचवायला कोणीच नव्हते. आता माझे वडील वारले आहेत, तर हे लोक त्यांचा मृतदेहही द्यायला तयार नाहीयेत,ङ्घङ्घ असा टाहो एका रडणार्या नातेवाईकाने जिल्हाधिकार्यांसमोर फोडला. रुग्णालयातील फायर फायटिंग सिस्टीम केवळ शोभेची वस्तू बनून राहिली होती, ती वेळेवर कामच आली नाही, असा आरोपही स्थानिक लोकांनी केला आहे.
२५ जणांना वाचवण्यात यश, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अर्ध्या डझन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक जवान आणि स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावत खिडक्या तोडून सुमारे २५ रुग्णांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांना तातडीने इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे मुजफ्फरपूरमधील खासगी रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.