पैठण, (प्रतिनिधी) येथे घडलेल्या एका तरुणीच्या अपहरणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततापूर्ण भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन कोले होते.
२५ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात खंडोबा मंदिर येथून करण्यात आली. मोर्चामध्ये हरिभक्त परायण महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, संत महंत, विद्यार्थी, पैठण शहरातील नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी डॉक्टर, वकील सामाजिक कार्यकर्ते तसेच पैठण
तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चा जवळपास दोन हजार नागरिकांची उपस्थिती होती.
मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. यावेळी वक्त्यांनी समाजातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न, पालकांनी घ्यावयाची काळजी, तसेच तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले. वक्त्या हर्षदा ठाकूर यांनी तरुण पिढीमध्ये सामाजिक सजगता, कायद्याचे पालन आणि मुलींच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सदर प्रकरणातील तरुणी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सर्वांनी कायद्यावर पूर्ण विश्वास ठेवून
तपास निष्पक्ष व वेगाने व्हावा, तसेच दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. मोर्चा पूर्णतः शांततेत व कायद्याचे पालन करून पार पडला. पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या वेळी शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग होता.










