निमखेड्यात वाळूमाफियांनी चक्क नदीचे पात्रच बदलले
फुलंब्री, (प्रतिनिधी) : तालुक्यातील निमखेडा परिसरातून वाहणाऱ्या गिरिजा नदीच्या पात्रात मागील दोन महिन्यांपासून अवैध वाळू उपशाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे.
रात्रीच्या अंधारात नदीच्या पाण्यातूनच यंत्रांच्या साहाय्याने वाळूची खुलेआम लूट सुरू असून, यामुळे पर्यावरणासह कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे वाळूमाफियांचे धाडस वाढले असून, या प्रकारामुळे शेती आणि पाणी पातळीला मोठा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, निमखेडा परिसरात दररोज दोन जेसीबीच्या
माध्यमातून रात्रभर उपसा केला जातो. ही वाळू वाहून निमखेडा परिसरात नेण्यासाठी सुमारे सुमारे १५ ट्रॅक्टर आणि प्रत्येकी सहा ब्रास क्षमतेच्या चार हायवा गाड्यांचा ताफा तैनात असतो. विशेष म्हणजे, नदी पात्रात पाणी असतानाही थेट यंत्रे उतरवून वाळू काढली जात असल्याने नदीचे नैसर्गिक पात्र बदलले जात आहे. यामुळे लगतच्या शेतजमिनी खचण्याची भीती निर्माण झाली असून, पाणी पातळी खालावल्याने भविष्यात शेतीसाठी पाण्याचे संकट ओढवण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
आजघडीला निमखेडा गाव, गेवराई गुंगी आणि निमखेडा शिवार परिसरात सुमारे ४० हून अधिक ठिकाणी वाळूचे बेकायदेशीर साठे करून ठेवण्यात आले आहेत. या साठ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या अवैध धंद्याला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना वाळू माफकांकडून दबाव, शिवीगाळ आणि ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.










