आर्य चाणक्यमध्ये गणित दिन उत्साहात

Foto
पैठण, (प्रतिनिधी) आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर, पैठण येथे थोर गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर कुलकर्णी तसेच प्रमुख अतिथी म्हणून राखी धोकटे ह्या होत्या. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी साक्षी बडेने श्री रामानुजन यांच्या जीवन चरित्रावर अतिशय सुंदर अशा गोष्टी रूपाने प्रकाश टाकला तर दैनंदिन जीवनात गणिताचे महत्त्व आदिश्री जैवळने ओघवत्या वाणीतून विशद केले. 

अनया शेवतेकरने गणितावरील स्वयंरचित कविता सादर केली. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेल्या पुष्पगुच्छानी पहिली ते सातवी पर्यंतच्या गणित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन नियोजन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमानंतर लगेचच पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित गती स्पर्धा पाढे पाठांतर स्पर्धा व इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुडोकू ही अतिशय नाविन्यपूर्ण अशी स्पर्धा घेण्यात आली. अशा रीतीने गणित दिवस अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिका फटांगडेने केले तर आभार प्रदर्शन सई कुंटेने केले.