टीईटी परीक्षेत गणित पेपरने फोडला घाम

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) : शहरातील २८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आज सकाळपासून सुरळीतपणे सुरू झाली. सकाळी ७.३० वाजताच उमेदवार परीक्षा केंद्रावर हजर राहिले  ज्यामुळे सुरक्षेच्या तपासण्या आणि प्रवेशाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र पहिल्या सत्रात गणिताने काही उमेदवारांना घाम फुटला असे दिसून आले.

टीईटी परीक्षा दोन सत्रामध्ये घेतली जात आहे. सकाळी ९.३० ते १२ यावेळेत पहिल्या सत्रात परीक्षा झाली. तर दुपारी दुसर्‍या सत्रात २.३० ते ५ या वेळेत परीक्षा घेतली जात असून २८ केंद्रावर एकूण १२ हजार ६६० उमेदवार परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली. परीक्षा संयोजकांनी परीक्षा नियोजन बद्ध परीक्षा घेण्यासाठी नियोजन केले. कडक सुरक्षा उपाय राबवले आहेत. उमेदवारांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात आली.  कडक तपासणी करूनच केंद्रात प्रवेश देण्यात आला. याशिवाय सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन येण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, नोट्स, पुस्तकं व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य बंदी असून, हे नियम काटेकोरपणे पाळले गेले. सकाळी घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण १५० गुणांची परीक्षा झाली त्यात पहिल्या विषयात सामाजिक शास्त्र किंवा गणित असा ६० गुणांचा विषय उमेदवारांनी निवडला तसेच दुसर्‍या विषयात मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी दोन विषय तीस, तीस गुणांचे निवडले. तर बालकांचा विकास हा तीन गुणांचा  विषय उमेदवारांनी निवडून परीक्षा दिली. 

गणिताने घेतली परीक्षा
आज पहिल्या सत्रात घेण्यात आलेल्या विषयात गणित विषयाने मात्र उमेदवारांचीच परीक्षा घेतली असल्याचे काहींनी सांगितले. सामाजिक शास्त्र किंवा गणित असा विषय निवडावा लागला. त्यात काहींनी गणित विषय निवडला त्यात काहींना गणित विषय सोडविताना अवघड झाले. त्यामुळे गणिताच्या विषयानेच अनेकांची पेपर घेतल्याचे दिसून आले.  शिक्षकांच्या भरतीसाठी घेतल्या जाणार्‍या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) मध्ये गणित विषयाचा महत्त्वाचा भाग परीक्षेत समाविष्ट होता. उमेदवारांनी या परीक्षेत आपली गणितातील क्षमता सिद्ध केली. परीक्षेत गणिताचे प्रश्न सोडविताना समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे उमेदवारांच्या चिंतेत भर पडली.