आरोग्य सुविधांचा घेतला आढावा; नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना
गंगापूर (प्रतिनिधी) : उपजिल्हा रुग्णालयात लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी अचानक भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. यावेळी न. प. उपाध्यक्ष अमोल जगताप यांच्यासह नगरसेवक संतोष अंबिलवादे, फैसल चाऊस, सय्यद अख्तर, योगेश पाटील, नवनाथ कानडे, अनिस बाबा, अजित राजपूत, सोपान देशमुख, मुकुंद जोशी, राहुल वानखेडे उपस्थित होते.
पाहणी दरम्यान रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का, नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत मिळत आहेत का तसेच रुग्णांना तत्पर व योग्य उपचार मिळत आहेत का याची माहिती घेण्यात आली. यावेळी विविध विभागांची पाहणी करून आरोग्य सेवांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.
नगराध्यक्ष संजय जाधव उपनगराध्यक्ष अमोल जगताप व नगरसेवकांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. तसेच रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून नागरिकांना अधिक चांगल्या व
दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
गंगापूर शहरातील नागरिकांना शासकीय आरोग्य सेवांचा अधिकाधिक लाभ मिळावा आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहून कार्य करावे, असे निर्देश नगराध्यक्ष संजय जाधव यांनी दिले.
नागरिकांचे आरोग्य हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार व वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. आरोग्य सेवांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
संजय जाधव, नगराध्यक्ष, गंगापूर















