सिल्लोड येथे यात्रा परिसराची नगराध्यक्षांनी केली पाहणी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): सिल्लोडचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सवाची सुरुवात उद्यापासून (दि. ७) एप्रिलपासून होत असून, या पार्श्वभूमीवर सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने आवश्यक त्या सर्व तयारीला वेग देण्यात आला आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी संबंधित अधिकारी व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह यात्रा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी यात्रा स्थळ, रस्ते, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, वीजपुरवठा, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली. यात्रा उत्सव दरम्यान मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले की, श्री म्हसोबा महाराज यात्रा हा सिल्लोड शहराचा एक महत्त्वाचा उत्सव असून, या काळात
हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयी-सुविधांची जबाबदारी नगरपरिषदेची असून, स्वच्छता, पाणी, प्रकाश व्यवस्था तसेच वाहतूक नियोजनावर विशेष भर देण्यात येत आहे.

यात्रा परिसरात तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी, कचरा व्यवस्थापनासाठी विशेष पथके, रस्त्यांची दुरुस्ती, इत्यादी नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नगर परिषदेचे अग्निशमन दल व इतर यंत्रणाही सतर्क ठेवण्यात येणार आहेत. नगरपरिषद प्रशासनाने भाविकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, यात्रा उत्सव सुरळीत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे.

या पाहणी वेळी उत्सव समितीचे पदाधिकारी सुदर्शन अग्रवाल, विठ्ठल सपकाळ, प्रताप प्रशाद, मनोज झंवर, शेख इम्रान, अशोक बन्सोड, सुधाकर पाटील, सुनील प्रशाद, मंजितराव भाग्यवंत, बाबुराव वाकडे, प्रशांत क्षीरसागर, शिवा टोम्पे, लखन ठाकूर, संतोष धाडगे, फहिम पठाण आदिंसह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, गावकरी उपस्थित होते.