ठाकरे सेनेच्या ६ नगरसेवकांना महापौरांनी दाखवला बाहेरचा रस्ता

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेच्या शुक्रवारी (दि. २७) झालेल्या विशेष सभेत पाणी योजना मंजूर करून शहराचा पाणीप्रश्न सोडविल्याबद्दल भाजप, शिवसेनेच्या (शिंदेगट) नगरसेवकांनी मांडलेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आदींच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला, तर उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा मांडलेला ठराव नाकारला, यावरून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहा नगरसेवकांनी आपली मागणी लावून धरली, यावरून झालेल्या वाद वाढल्याने अखेर महापौरांनी सहाही नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश सुरक्षारक्षकांना दिले. दरम्यान, याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवकही आक्रमक झाले होते.सुरक्षारक्षकांना गटनेते गणेश लोखंडे, माजी महापौर रशीद मामू यांच्यासह इतर नगरसेवकांना बाहेर काढले. या घटनेनंतर उबाठाचे सहा नगरसेवक महायुतीच्या ७० नगरसेवकांवर भारी ठरल्याची चर्चा यावेळी मनपात रंगली. उबाठाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणी योजना मंजूर केली, योजनेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले याची आठवण करून देत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, मात्र महापौर समीर राजूरकर यांनी त्यास नकार दिला. त्यावरून लोखंडे यांच्यासह माजी महापौर रशीद मामू यांच्यासह उबाठाचे सहाही नगरसेवक महापौरांच्या समोर जावून उभे राहिले. त्यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही ते बधले नाहीत. अभिनंदनाचा ठराव घ्यावाच लागेल, तोपर्यत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर महापौरांनी सहाही सदस्यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाजही रखडले होते. अखेर सुरक्षारक्षकांनी लोखंडे यांना उचलून बाहेर नेले. सचिन खैरे, रशीद मामू यांनाही जबरदस्तीने ढकलत नेले.