’बायोवेस्ट’साठी महापौर करणार मध्यस्थी

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील मेडिकल वेस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायोटेक कंपनीची नियुक्ती केली. पण, प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकेने हकालपट्टी केलेल्या नाशिक येथील वॉटग्रेस कंपनीवर मेहरबान असल्याने बायोटेक कंपनीला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. आता या प्रकरणात महापौरांनी लक्ष घातले असून, लवकरच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. गेल्या वर्षभरापासून हा वाद सुरू असून, प्रकरण सध्या न्यायालयात आहे.
महापालिकेने शहरातील मेडिकल वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी नाशिक येथील वॉटरप्रेस कंपनीची नियुक्ती केली होती. त्यासाठी २० वर्षांचा करार करण्यात आला होता. कंपनीच्या प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार वारंवार समोर आला होता. याप्रकरणी नगरसेवकांनी अनेकवेळा तक्रारीदेखील केल्या. त्यानंतरही प्रशासनाने कराराची मुदत संपल्यानंतरही या कंपनीला काम देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमातून टीकेची झोड उठताच निर्णय मागे घेत नव्याने निविदा प्रक्रिया राबवीत बायोटेक कंपनीला काम देण्यात आले. या कंपनीतर्फे सर्व नियम पाळून काम केले जात असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यात खोडा घातला. बायोटेक कंपनीच्या नव्या प्रकल्पाला परवानगी नाकारत मंडळाने वॉटरप्रेस कंपनीच्या नव्या प्रकल्पाला मंजुरी दिली. याप्रकरणी तत्कालीन प्रशासक जी. श्रीकांत यांनी वारंवार पाठपुरावा केला पण मंडळाने त्याची दखल घेतली नाही. पर्यावरण राज्यमंत्र्यापर्यंत हा विषय गेला. पण उपयोग झाला नाही, त्यामुळे बायोटेक कंपनीने न्यायालयात धाव घेतली. त्यात आता महापौर राजूरकर यांनी लक्ष घातले असून, मंगळवारी (ता. दहा) त्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. त्यात यासह शहरातील डॉक्टरांच्या परवानगी नूतनीकरणासंदर्भात होणार्‍या विलंबावर लवकरच पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
प्रमुख कामांची यादी 
तयार करण्याचे आदेश
बैठकीत आरोग्य विभागाच्या प्रमुख कामांची यादी तयार करण्याचे आदेश महापौरांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना दिले. त्यात रिक्त पदे भरण्याबाबतही राजूरकर यांनी सूचना केली. आरोग्य विभागात ५०१ पदे मंजूर आहेत. त्यातील २७१ पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची २७ पदे मंजूर असताना सध्या केवळ ८ ते ९ कायम डॉक्टर महापालिकेत कार्यरत आहेत.