औरंगाबाद: मनपा प्रशासनाच्या वतीने उद्या गुरुवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही पहिलीच सर्वसाधारण सभा होत असल्याने शहरातील गेल्या काही दिवसातील पाणी पुरवठ्याचे कोलमडलेले नियोजन, नालेसफाई व सव्वाशे कोटी रुपयांची रस्त्यांची यादी आदी विषयांनी सर्वसाधारण सभा चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने गेल्या काही दिवसात पार पडलेल्या सर्वसाधारण सभांमध्ये धोरणात्मक निर्णय तसेच विविध विषयांवर चर्चा करता आलेली नाही. या निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच संपली असून, त्यानंतर उद्या सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणारी सर्वसाधारण सभा आचार संहिता संपल्यानंतरची पहिलीच सभा आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. काही वसाहतींमध्ये तर सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही नालेसफाईचे भिजत घोंगडे अजूनही कायम आहे. शासनाकडे पाठवण्यात येणारी सव्वाशे कोटी रुपयांची रस्त्यांची यादी सभेसमोर सादर करण्यात येणार आहे. या मुद्द्यांवरून ही सर्वसाधारण सभा चांगलीच गाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावेळी अग्निशमन विभागाला ट्रेलर व पोर्टेबल पंपाचे अंदाज पत्रक सभेत मान्यतेकरिता, लेखा विभागातील 32 कोटींची बिले ज्येष्ठता यादी न बघता अदा करणे आदी मुद्द्यांवर देखील या सर्वसाधारण सभेत चर्चा होणे अपेक्षित आहे.
















