म्हसोबा यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात

Foto
नगर परिषद, यात्रा उत्सव समितीकडून तयारी

सिल्लोड, (प्रतिनिधी) : शहराचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यांचा यात्रा महोत्सव आज (दि. ७) पासून सुरु होत आहे. यात्रा उत्सव समिती व नगर परिषदेच्या वतीने यात्रा निमित्त स्वछता, विविध सुविधा, पोलिस बंदोबस्त, उन्हाची तिवृता लक्षात घेता यात्रा परिसरामध्ये रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत रोषणाई, उन्हाची तीव्रता सावली साठी विविध ठिकाणी मंडप, मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोक व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष तथा यात्रा उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी दिली आहे.

आज सकाळी ९:०० वाजता श्री च्या शेंदुर, टोप मिरवणूक व अभिषेकाने यात्रेला सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता बारागाड़े त्यानंतर ५ वाजेला तगतराव, सायंकाळी ७ : ३० वाजता आतिषबाजी, रात्री ९ वा दशावतारी सोंगे सुरुवात होणार आहे. बुधवार (दि.८) रोजी पहाटे ४ वाजता श्री
म्हसोबा महाराज यांच्या स्वारीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळ पासून हजऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे. यात्रा परिसरामध्ये नवस पूर्तिसाठी विविध व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात भव्य असे रहाटपाळणे, प्रसाद व विविध दुकाने थाटली आहेत. म्हसोबा महाराज यांचा भक्त परिवार संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

यात्रे निमित्त यात्रा उत्सव आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा : 
यात्रा उत्सव हा आपल्या गावाच्या श्रद्धेचा व परंपरेचा महत्त्वाचा भाग असून, मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखत, प्रशासनाला सहकार्य करून श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी केले आहे. भाविक दूरदुरुण दर्शनासाठी येतात. यात्रा उत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी केले आहे.