विमानातील थरार ...!! दुबईहून तेल अवीवला निघालेल्या विमानाचे अपहरण? पायलटवर चाकूहल्ला...!

Foto
दुबई : दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जाणाऱ्या 'फ्लाईदुबई' या विमानातील धक्कादायक आणि थरारक घटनाक्रमाची नवी माहिती समोर आली आहे. हे विमान हवेत असताना एका वैमानिकाने आत्महत्येचा प्रयत्न करत विमान जमिनीवर आदळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये जीवघेणी हाणामारी झाली असून त्यात चाकूने वार करण्यात आल्याचा खळबळजनक दावा विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केला आहे. या अभूतपूर्व संघर्षामुळे विमान अवघ्या दोन मिनिटांत ३४,००० फुटांवरून १६,६०० फुटांपर्यंत खाली कोसळले होते. अखेर प्रवाशांच्या आणि दुसऱ्या वैमानिकाच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला आणि विमानाचे सौदी अरेबियामध्ये सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

कॉकपिटमधून किंचाळ्या अन् रक्ताचे डाग; प्रवाशाने सांगितला थरारक अनुभव
विमानात बहुतांश इस्रायली प्रवासी प्रवास करत होते. सौदीतील लँडिंगनंतर एका प्रवाशाने 'I24NEWS' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विमानातील भयावह परिस्थिती मांडली. "काही मिनिटांसाठी आम्हाला खात्री पटली होती की आमची हत्या होणार किंवा विमान क्रॅश होणार. कॉकपिटमधून लोकांच्या मोठ्याने ओरडण्याच्या आणि किंचाळण्याच्या आवाजांमुळे संपूर्ण केबिनमध्ये घबराट पसरली होती."

प्रवाशाने दावा केला की, एका वैमानिकावर धारदार चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी प्रसंगावधान राखून काही प्रवाशांनी कॉकपिटमध्ये घुसून हल्लेखोराला पकडून जमिनीवर दाबून ठेवले, ज्यामुळे विमानाचा ताबा मिळवता आला. एका इस्रायली पत्रकाराने या विमानातील एका प्रवाशाचा फोटो शेअर केला आहे, ज्याच्या टी-शर्टवर रक्ताचे डाग स्पष्ट दिसत आहेत.

रशियन आणि युक्रेनियन पायलटमध्ये रक्तरंजित वाद?
या घटनेबाबत विविध आंतरराष्ट्रीय आणि इस्रायली माध्यमांतून धक्कादायक दावे केले जात आहेत. इस्रायल चॅनेल १४ च्या वृत्तानुसार विमानातील दोन वैमानिकांपैकी एक रशियन आणि दुसरा युक्रेनियन नागरिक होता. आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये कॉकपिटमध्येच हिंसक वाद उफाळून आला.

विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न 
प्राथमिक संशयानुसार, एका वैमानिकाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विमान 'मॅक १' च्या प्रचंड वेगाने ३०,००० फुटांवरून सरळ १५,००० फुटांपर्यंत स्टीप डाईव्ह करून खाली आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या वैमानिकाने जीवावर उदार होऊन त्याच्याशी संघर्ष केला आणि विमानाचे नियंत्रण पुन्हा मिळवले. या झटापटीत चाकूचा वापर झाल्याचे आणि वैमानिक जखमी झाल्याचे समोर येत आहे.