महाड : महाड मारहाण प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचा कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. २ डिसेंबर २०२५ रोजी महाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान सुरू होते, तेव्हा विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांवर हल्ला केला होता. याप्रकरणी विकास गोगावले यांच्यासह २९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र तेव्हापासूनच सर्व आरोपी फरार झाले होते. त्यानंतर विकास गोगावले यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता.
महाड नगरपालिका निवडणूक काळात मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक २ मध्ये झालेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील मारहाण प्रकरणी विकास गोगावले यांचा माणगाव कोर्टाने २ वेळा आणि मुंबई कोर्टाने १ वेळा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेतं. विकास गोगावले गेल्या २४ दिवसांपासून फरार असल्याची माहिती मिळत असून राष्ट्रवादीचे नाना जगताप देखील मारहाण प्रकरणानंतर फरार आहेत. त्यामुळे या फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
महाड नगरपालिका निवडणुक मतदानाच्या दिवशी झालेल्या या राडाप्रकरणी विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे महाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते.मात्र हे आरोपींचे कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर हे सगळे आरोपी फरार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून पालकमंत्रीपदावरुन भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद सुरु आहेत. याच वादातून दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. गेल्या काही काळामध्ये तटकरे आणि गोगावले या दोघांनीही एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडले आहेत. त्यामुळे सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वैर आणखीनच वाढले आहे. याचा उद्रेक मतदानावेळी पाहायला मिळाला.