झालेला प्रकार चुकीचा, माझा सहभाग सिद्ध झाला तर राजीनामा देईन, ५० हजारांची लाच घेताना क्लर्कला अटक होताच मंत्री नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

Foto
मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकत दोन कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले. कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने ५० हजार रुपयांची लाच मागितली आणि त्यातील ३५ हजार रुपये स्वीकारत असताना त्याला पकडण्यात आले. या सर्व घटनेवर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नरहरी झिरवाळ सध्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर त्यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत असताना आपली बाजू मांडली. ते म्हणाले, मी दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जो काही प्रकार झाला, तो अतिशय चुकीचा होता. असे व्हायला नको होते. राजेंद्र ढेरंग हे लिपिक म्हणून काम करतात. सुनावणीचे कागदपत्र तयार करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. ते मुळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी आहेत. त्यांना उसनवारीवर या विभागात घेतले होते. त्यांच्याकडून हा प्रकार घडला. या प्रकाराला कुठेही पाठिशी घालणार नाही.

सदर कर्मचार्‍याचा पूर्वेतिहास माहीत नव्हता का? या प्रश्नावर बोलताना झिरवाळ म्हणाले की, माझ्यासमोर या कर्मचार्‍याची तक्रार यापूर्वी कधी आली नव्हती. लाचेची रक्कम कितीही असली तरी सरकारी कर्मचार्‍याने अशाप्रकारे पैसे घेणे चुकीचेच आहे. पैसे घेतले आहेत तर त्याची शिक्षा आता संबंधित व्यक्तीला भोगावी लागेल.

तर मी राजीनामा देईन  नरहरी झिरवाळ

तुमच्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे येत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत, असा प्रश्न विचारला असता मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, तसे जर माझ्यापर्यंत धागेदोरे येत असतील आणि ते सिद्ध होत असेल तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार असेन. या भ्रष्टाचाराचे माझ्याशी संबंध असल्याचे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असेही मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.

सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद आणि विलीनीकरणाच्या बाजूने बोलल्यामुळे तुमच्याविरोधात कट रचला जात आहे का? असा प्रश्न विचारला असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, माझ्याविरोधात कुणी कट रचेल असे वाटत नाही. माझा तसा स्वभाव नाही.

कोण आहेत झिरवाळ?

मंत्री नरहरी झिरवाळ हे जिल्हा नाशिक मधील दिंडोरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. सध्या त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन हा विभाग आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ङ्गसुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षपद द्यावे, अशी सर्वप्रथम झिरवाळ यांनीच मागणी केली होती.