कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणार्‍या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला तत्काळ अटक , २१ मे पर्यंत पोलीस कोठडी

Foto
कल्याण : पुण्याच्या नसरापूरमधील चिमुरड्या मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या मुलीला कल्याणहून खोपोली येते आपल्या मामाच्या घरी जायचे होते. त्यासाठी ही मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती. त्यावेळी आरोपीने तिचा मोबाईल फोन हिसकावून घेत तिला आपल्यासोबत येण्यास भाग पाडले आणि तिच्यावर अत्याचार केले. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेबाबर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहे.  सौरभ सोनावणे (वय, २३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.   न्यायालयाने सौरभला २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ही मुलगी अहिल्यानगरमधून आपल्या मामाच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. अल्पवयीन मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहत उभी होती. त्यावेळी सौरभ सोनावणे हा तिला भेटला. त्याने मुलीच्या हातामधील मोबाईल फोन हिसकावून घेतला. मुलीने जेव्हा मोबाईल परत मागितला तेव्हा सौरभ याने, मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये चल, असे सांगितले. यानंतर सौरभ सोनावणे या मुलीला कल्याण रेल्वे यार्डात घेऊन गेला. याठिकाणी सौरभने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मात्र, मुलीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करत रेल्वे पोलीस ठाणे गाठले. तिने पोलीस ठाण्यात शिरताच सारा प्रकार सांगितला. हा सगळा प्रकार ऐकताच लोहमार्ग पोलिसांना तातडीने तपासाला सुरुवात केली. 

पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सौरभ सोनावणे याला शोधून काढले. कल्याण सारख्या बहुतांश वेळ गजबजलेल्या रेल्वे स्थानकात ही घटना घडली आणि कोणालाही त्याचा थांगपत्ता लागला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच या सगळ्या प्रकारामुळे रेल्वे पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहे. या सगळ्यानंतर आता रेल्वे पोलीस आणि सरकार काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.