कन्नड, (प्रतिनिधी): एका १७ वर्षीय मुलीने घराच्या आढ्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कन्नड तालुक्यातील मुंगसापूर येथे शुक्रवारी (दि.१३) दुपारी तीन वाजता ही घटना उघडकीस आली. आशा शिवाजी पवार असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. या संदर्भात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार एस.व्ही. कनकुटे यांनी सांगितले की, आत्महत्या केलेल्या आशा हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे.
वर्षभरापासून ती शिक्षण सोडून, शेतात मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होती. शुक्रवारी सकाळीच तिचे आई-वडील, भाऊ बहीण हे शेतात कामाला गेले, ती मात्र तब्येत बरी नाही म्हणून घरीच थांबली. दुपारी तिचा भाऊ प्रसाद हा घरी आला तेंव्हा त्यास ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार, हर्षवर्धन काळे, संदीप कनकुटे, शरद धुमाळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ग्रामस्थांच्या मदतीने तिला औराळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप झगरे यांनी तिला मृत घोषित केले. रात्री उशिरा डॉ. झगरे, डॉ. प्रतीक्षा राजपूत यांनी तिची शवचिकित्सा केली. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.











