छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मुले चोरणारी किंवा मुलांच्या अंगावरील दागिने ओरबाडणारी टोळी असल्याच्या संशयातून चार भिक्षेकरी महिलांना जमावाने चोप दिला. मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी भागात रविवारी (दि. १५) सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रकरण एमआयडीसी सिडको पोलिसांकडे गेले असून त्या तरुणींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी भागात सकाळपासून चार महिला घरोघरी भिक्षा मागत होत्या. दिवसभरात त्यांनी परिसर पिंजून काढला. त्यांना काही ठिकाणी महिलांनी फराळासाठी साबुदाणा दिला. सायंकाळी एका ठिकाणी फराळ देणार्या मुलीला यातील एका महिलेने तुझ्या गळ्यातील चेन छान आहे, मला देते का? म्हणत तिच्याकडे चेनची मागणी केली. तिचा हात पकडून चल माझ्यासोबत म्हणत तिला ओढले. हा प्रकार त्या मुलीच्या आईने पाहिला. तिने लगेचच आरडाओरड केली. परिसरातील लोक तेथे जमा झाले. तेव्हा भिक्षेकरी महिलांनी पळ काढला. मात्र, जमावाने पाठलाग करून मुलीची सुटका करीत भिक्षेकरी महिलांना पकडत मारहाण केली.
नगरसेवकांकडून सुटका
मूर्तिजापूर म्हाडा कॉलनीत लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आल्याची माहिती मिळताच नगरसेवक मनोज गांगवे, पदाधिकारी दीपक खोतकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भिक्षेकरी महिलांची सुटका करीत एमआयडीसी सिडको पोलिसांना माहिती दिली. भिक्षेकरी महिलांना ठाण्यात नेले. त्यातील एका महिलेने मुलीचा हात धरला पण तिचे सोने मागितले नाही, असे बोलून दाखविले.












