मनपा अतिक्रमण पथकावर जमावाची दादागिरी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहागंज येथील हातगाडी कारवाईला विरोध करत महापालिकेच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत पिटाळून लावल्याप्रकरणी मनपा उपायुक्तांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयएमच्या नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकर्त्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहागंज परिसरात सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान एमआयएमचे नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत मनपाच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत पिटाळून लावल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सविता अंनतराव सोनवणे (५४, रा. उल्कानगरी) यांनी फिर्याद दिली त्यानुसार, महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहागंज भागात रहदारीस अडथळा ठरणार्‍या हातगाड्या व अन्य अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू होती. ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे करण्यात येत होती. दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास १५ ते २० नगरसेवक व त्यांच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांनी शहागंज परिसरात गर्दी करत कारवाईस विरोध केला. 
तसेच विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्यासह इतर नगरसेवकांनी शिवीगाळ करत महापालिकेला शहागंज परिसरात दादागिरी करू देणार नाही, अशा धमकीवजा घोषणा दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच हातगाडीधारकांना पुन्हा रस्त्यावर व्यवसाय सुरू करण्यास चिथावणी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक श्रीनिवास रॉयलवार हे करीत आहेत.