नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर निर्बंध लादले आहेत. भारतावरील हे निर्बंध इराणने स्ट्रेट ऑफ होर्म्युझ बंद केल्यानंतर कमी एक महिन्यासाठी कमी केले होते. आता पुन्हा एकदा हे निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे रशियन तेल खरेदीसाठी मिळालेली ३० दिवसांची सूट संपुष्टात आली आहे. भारतरशियाकडून कच्चे तेल आणि एलपीजीची खरेदी सुरूच ठेवणार आहे. भारताचे ऊर्जा आयात धोरण हा पूर्णपणे भारताचा स्वतःचा निर्णय आहे आणि ते अमेरिकेच्या निर्बंधांवर अवलंबून नाहीत, असे भारत सरकारच्या सूत्राकडून सांगण्यात येत आहे.
अमेरिकेने सूट वाढवली नसली तरी, भारतीय रिफायनरी निर्बंधांच्या अधीन नसलेल्या कंपन्या आणि जहाजांकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवतील. सूट देणे किंवा न देणे हा अमेरिकेचा विशेषाधिकार आहे, परंतु त्यामुळे भारताचे धोरण ठरत नाही. "रशियाकडून अधिक एलपीजी खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कच्चे तेल आणि एलपीजी दोन्ही निर्बंधमुक्त स्रोतांकडून येत राहतील," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अमेरिकेने सूट केली रद्द
यापूर्वी, अमेरिकेने रशिया आणि इराणकडून तेल खरेदीवरील ३० दिवसांची सूट रद्द केल्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने आर्थिक निर्बंध वाढवण्याची तयारी करत असल्याचे आणि इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर अतिरिक्त निर्बंध लादण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीचा थेट उल्लेख केला नाही.
मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात तेल केले आयात
मार्च २०२६ मध्ये भारताने रशियाकडून दररोज सरासरी १९.८ ते २०.६ लाख बॅरल तेल आयात केले, हे २०२३ नंतरचे सर्वाधिक प्रमाण आहे. यापूर्वी, २०२३-२४ मध्ये भारताच्या एकूण तेल आयातीत रशियन तेलाचा वाटा ३५.९ टक्के होता. २०२४-२५ मध्ये तो अंदाजे ३५.८ टक्क्यांवर कायम राहिला. मार्च २०२६ मध्ये, चीननंतर भारत रशियन ऊर्जेचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार होता, त्यांनी अंदाजे ५.८ अब्ज युरोची आयात केली.
अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत सरकारी मालकीच्या तेल शुद्धीकरण कंपन्यांकडून रशियाकडून होणाऱ्या आयातीत तब्बल १४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारात रशियन तेलाचा साठा वाढल्यामुळे हा आकडा वाढला आहे, पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत प्रत्येक संभाव्य स्रोताकडून ऊर्जा खरेदी करण्याचे धोरण अवलंबत आहे. युक्रेन युद्धानंतर भारत रशियाचा सर्वात मोठा सागरी खरेदीदार बनला होता. गेल्या वर्षी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे परिस्थिती बदलली. आता, इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर परिस्थिती पुन्हा बदलली असून, भारताने रशियाकडून आपली तेल खरेदी वाढवली आहे.