नवी दिल्ली : व्हिएसआर कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे. त्यात सत्तेतल्या लोकांचा समावेश आहे. शिवाय ज्या उद्योगपतींचे राजकीय कनेक्शन आहे त्यांचाही कंपनीत सहभाग आहे. बारामती विमान अपघाताबाबत २ प्रकारचे षडयंत्र असू शकते. त्यात एक राजकीय आणि दुसरे व्यावसायिक षडयंत्र असू शकते. यामागचे खरे कारण शोधले पाहिजे. जी कंपनी विमान अपघाताला जबाबदार आहे त्याला जर कुणी सपोर्ट करत असेल आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर तेदेखील एक षडयंत्र असू शकते असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, व्हिएसआर कंपनीच्या पाठीशी इतके शक्तिशाली लोक आहेत, त्यात डीजीसीएचे अधिकारीही पाठीशी आहेत. त्यामुळे जर अजित पवारांना न्याय द्यायचा असेल तर देशातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे न्याय देऊ शकतात. कारण इतर जे कुणी आहेत तेही पॉवरफुल आहेत परंतु सध्या देशात सर्वात जास्त २ व्यक्ती पॉवरफुल आहेत. त्यामुळे विमान अपघातावर मोदी-शाह यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. याबाबत पंतप्रधान मोदींना ईमेलद्वारे पत्र पाठवणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच केंद्रीय नागरी हवाई मंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घ्यावा अशी आमची मोठी मागणी आहे. मोदी-शाहांकडे आमची ही मागणी असेल. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हा विषय हाती घ्यावा आणि टीडीपी पक्षाचे नेते जे नागरी हवाई वाहतूक मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. मधील मोठमोठे अधिकारी कंपनीला मदत करत आहेत. जर अपघाताची चौकशी हे अधिकारी करत असतील तर चोरच पोलिसांची चौकशी करत असल्याचं बोलावे लागेल. जी चौकशी समिती नेमली त्या अधिकार्यांना लिअरजेटबाबत काहीच माहिती नाही. १५ फेब्रुवारीला चौकशीचा रिपोर्ट येणार होता त्याचे काय झाले? असा सवाल आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला.
पायलट सुमित कपूरवर दबाव?
दरम्यान, अपघातग्रस्त विमानातील पायलट सुमित कपूर यांच्यावर आर्थिक दबाव होता का? ४ ते ५ वर्ष या पायलटला नोकरी नव्हती. जेव्हा जेट एअरवेजमध्ये ते कामाला होते त्यांना महिन्याला १०-१२ लाख पगार होता. मात्र तिथून त्यांना दुसरीकडे कुठेच नोकरी मिळत नव्हती म्हणून त्यांनी कंपनी ज्वाईन केली. तिथे त्यांना ३-४ लाख पगार दिला जात होता. त्याशिवाय प्रत्येक फ्लाईटला २० हजार दिले जायचे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण होता अशी आम्हाला माहिती आहे. या पायलटला विमानाच्या लायबिलिटी इन्शुरन्सबाबत माहिती होती का याचीही चौकशी झाली पाहिजे असं रोहित पवारांनी म्हटलं.