दुसर्‍यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये : राज ठाकरे , झाले ते चूकच पण भाजपने १२ वर्षात जे पेरले, त्याच शिव्या वाट्याला आल्या....

Foto
मुंबई - पंतप्रधानांना शिव्या देणे, त्यांच्या आईला बोलणे हे चुकीचेच आहे. परंतु दुसऱ्यांनाही आई असते. हे भाजपाने त्यांच्या पक्षातील लोकांना सांगितले पाहिजे. तुम्हीही मर्यादा पाळली पाहिजे. १२ वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केले त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी जंतर मंतरला बसले, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. त्यांची डोकी फोडली. हे कारवाईचे आदेश देणारे कधी माफी मागणार? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, कुणाच्याही बाबतीत इतक्या खालच्या स्तराची भाषा वापरली जाऊ नये हे मला पंतप्रधानांचे शंभर टक्के मान्य आहे. फक्त ते भाजपातील लोकांनाही सांगितले पाहिजे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींपासून आतापर्यंत, अगदी आमच्यापर्यंत ज्या प्रकारे तुमची ट्रोलची टीम राज्याराज्यात बसवली आहेत. ते कोणत्या भाषेत काय गोष्टी करत असतात हे आमच्या कानावर येते. अनेक कलाकार बोलायलाच तयार नाही. पोस्टमध्ये इतक्या शिव्या दिल्या जातात. ही यांचीच माणसे भरलेली असतात. त्यामुळे पंतप्रधानांनी भाजपातील लोकांनाही शिव्या देऊ नये हे सांगितले पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच भाजपाच्या ट्रोल टीमने गेल्या १२ वर्षापासून ज्या गोष्टी सुरू केल्या त्यातूनच हे पुढे आले. जे पेराल ते उगवेल त्याप्रमाणे हे तुमच्या अंगावर आले. कुणाच्या आईबद्दल बोलणे हे चुकीचेच आहे. तुमच्या पक्षातील लोकांनीही मर्यादा पाळल्या पाहिजे. NEET परीक्षा हे कारण आहेच, परंतु हे का घडले ते पाहिले पाहिजे. मात्र या आंदोलनामुळे जे रौद्ररूप धारण केले ते भोवताली असलेल्या वातावरणामुळे झाले. फुटपाथवरून चालता येत नाही. आमच्याकडे बागा नाहीत. लहान मुलांना खेळायला मैदाने नाहीत. शिक्षण झालंय पण नोकरी नाही. एकाच उद्योगपतीवर मेहरबानी सुरू आहे. देशात फक्त निवडणुका सुरू आहेत. आमदार-खासदार फोडले जाताहेत. डिजिटल इंडिया बोलले जाते मग फुटलेल्या आमदार-खासदारांसाठी कार्ड कुठे स्वाईप करतात? असा चिमटा राज ठाकरे यांनी सरकारला काढला. 

...मग'जेन झी'चा पारा चढणार की नाही?

मुंबई, पुणे दिल्लीतील तरूण फक्त जेन झी नाहीत तर ग्रामीण भागातील जेन झी तरूण आहेत. या मुलांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना काय हवंय ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. लहानपणी आमचे आई वडील सांगायचे, झोपताना डोक्याला तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. मात्र एका माणसाने आयुष्यभर डोक्यावर तेल चोपडले परंतु बुद्धी आली नाही. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे राज्याचे उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री, आपण काय बोलतोय, जग कुठे चाललंय..? दगडावरच्या फिंगरप्रिंट आधारशी लिंक करणार म्हणतात, हे कसं होणार? मला चंद्रकांत पाटील यांच्या बुद्धीवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत. कोल्हापूरांनी या माणसाला ज्ञान मिळावे म्हणून शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात पाठवले. तिथेही काही झाले नाही. असे तंत्रज्ञान शिक्षण मंत्री असतील तर जेन झीचा पारा का चढणार नाही असा टोला राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

दरम्यान, हा विषय कुणाला सत्तेवरून खाली खेचण्याचा नाही. हा विषय देशाचा आहे. देशाच्या भविष्याचा विषय आहे. तरुणांच्या भवितव्याचा आहे. युवकांच्या आशा अपेक्षांचा मारल्या जाताहेत. NEET परीक्षेतील पेपरफुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या आई वडिलांची माफी कोण मागणार? विद्यार्थ्यांचे, तरुणांचे मत समजून घेतले पाहिजे. आज हा विद्यार्थी हवालदिल झालेला आहे. हा तरूण देवळात जातो, देवासमोर नतमस्तक होतो परंतु आता देवळातच चोऱ्या व्हायला लागल्या. लोकांच्या भावनिकतेशी जोडलेल्या राम मंदिराच्या ठिकाणी १४०० कोटींची चोरी होते. यावरून सरकारमधील कुणीही बोलायला तयार होत नाही. राम मंदिराच्या नावे मत मागतात पण चोरीवर कुणी बोलायला तयार नाही असं सांगत राज ठाकरेंनी भाजपावर घणाघात केला.