तेहरान : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावरील अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे. यातच अली खामेनी यांच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इराणमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यांचे पुत्र आणि विद्यमान सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई अंत्यविधीला उपस्थित राहणार नाहीत, अशी मोठी माहिती समोर येत आहे.
अमेरिका व इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या लष्करी मोहिमेवेळी २८ फेब्रुवारी रोजी अली खामेनेई ठार झाले. यानंतर पश्चिम आशियामध्ये एका मोठ्या युद्धाला तोंड फुटले. भारतातील इराणचे प्रतिनिधी अयातुल्ला हकीम इलाही यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलकडून ठेवली जाणारी पाळत आणि हल्ल्याच्या धोक्यामुळे मोज्तबा यांच्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे असुरक्षित मानले गेले. त्यामुळे त्यांनी अंत्यविधीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला.
या अंत्यविधीला लाखो लोक उपस्थित राहतील
४ जुलै रोजी तेहरान येथून अयातुल्ला अली खामेनेई यांची अंत्ययात्रा काढली जाणार आहे. ९ जुलै रोजी मूळ गावी मशहद येथे अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर दफनविधी केले जाणार आहेत. अनेक शहरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाईल. या अंत्यविधीला लाखो लोक उपस्थित राहतील अशी इराण सरकारला अपेक्षा आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, अली खामेनी यांचे पुत्र आणि सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी उपस्थित राहू शकणार नाहीत.
दरम्यान, अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराच्या दरम्यान जर अमेरिका किंवा इस्रायलने कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे अत्यंत गंभीर आणि भयानक परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा थेट आणि कडक इशारा इराणने दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक लॉरा लुमर यांनी खामेनेईंचा अंत्यसंस्कार इस्रायलसाठी बॉम्बफेक करण्याची मोठी संधी आहे असे वादग्रस्त ट्विट केल्यानंतर इराणने आक्रमक भूमिका घेतली आहे.