मुंबई : राज्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसणार्या नागरिकांसाठी आणि चातकासारखी पाण्याची वाट पाहणार्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अखेर शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने दक्षिण कोकणच्या काही भागांसह गोव्यात पूर्णपणे प्रवेश केला असून, महाराष्ट्राच्या काही भागात त्याची आगेकूच सुरू आहे.
६ जून रोजी मान्सूनच्या प्रवासाचा वेग चांगला होता. हवामान खात्याकडील माहितीनुसार, मान्सून संपूर्ण गोवा राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग (दक्षिण कोकणचा भाग), कर्नाटकचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि तामिळनाडूचा बहुतांश भाग, पूर्व-मध्य आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, दक्षिण-पश्चिम बंगालचा उपसागर, मध्य-पूर्व बंगालचा उपसागर संपूर्णपणे व उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराच्या काही भागासह ईशान्येकडील मिझोराम आणि मणिपूर या राज्यांच्या काही भागातही मान्सून दाखल झाला आहे.
पुढील ४-५ दिवसांत म्हणजेच पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत मान्सून आणखी गती पकडेल. मान्सून संपूर्ण मध्य अरबी समुद्र व्यापून टाकेल. महाराष्ट्राच्या बर्याच मोठ्या भागात मान्सूनचा आणखी विस्तार होईल. ज्यामुळे मुंबईसह उत्तर व मध्य महाराष्ट्रात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि सिक्कीमच्या काही भागात मान्सून सक्रिय पाऊल टाकेल.
पुढील २-३ दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणाच्या काही भागात, तामिळनाडूच्या उर्वरित भागात, ईशान्येकडील राज्यांच्या आणखी काही भागात सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. : कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ