महाराष्ट्रात मान्सून, मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजा कडाडणार

Foto
पुणे : देशात एकाच वेळी हवामानाची दोन परस्परविरोधी रूपे पाहायला मिळत आहेत. केरळमध्ये मान्सून लांबल्यामुळे महाराष्ट्रातही त्याचा प्रवेश उशिरा होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, दुसरीकडे उत्तर आणि वायव्य भारतासाठी पुढील २४ ते ४८ तास अत्यंत महत्वाची असणार आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरयाणात ताशी १०० किमी वेगाने वाहणारे वादळ, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, परंतु मुख्य भूमीवर पोहचण्यास त्याला वेळ लागत आहे. दरम्यान, वायव्य भारतात चक्रीवादळ आणि पावसामुळे कमाल तापमानात ६ ते ८ अंश सेल्सिअसची लक्षणीय घट होणार असून, नागरिकांना दमट उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या येत्या दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार राज्यात ११ जूनपर्यंत किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अंतर्भागात अल्प पावसाचा अंदाज आहे. देशातील बहुंताश भागातही या काळात फारसा पाऊस नसेल. मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, ३१ मे ते ३ जूनदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजा कडाडणार आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात मान्सूनचे वारे दक्षिण भारताच्या काही भागात व्यापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ४ ते ११ जूनपर्यंत कोकण, गोवा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशला बसण्याची शक्यता असून, पश्चिम उत्तर प्रदेशात ८० ते १०० किमी तर पूर्व उत्तर प्रदेशात ७० ते ८० किमी वेगाने वादळी वारे वाहतील. दिल्ली आणि हरयाणामध्येही ३० मे पर्यंत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची स्थिती कायम राहील.