मान्सूनने चकवले; तीन दिवस उशिरा येणार , हवामान विभागाचा नवा अंदाज...

Foto
पुणे : यंदा २६ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने आधी वर्तवला होता. एरवी १ जूनला येणारा मान्सून पाच दिवस आधीच येणार म्हणून उकाड्याने त्रस्त असणार्‍यांना काहीसा दिलासा मिळाला होता, तर शेतकरीही पेरणीपूर्व तयारीला लागले होते. पण, तारीख उलटून गेली, तर मान्सूनचा पत्ताच नाही. जो अंदाज व्यक्त केला गेला, प्रत्यक्षात तसे घडले नाही. मान्सून आता कधी येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागेल आहे. आता हवामान विभागाने याबद्दल नवीन अपडेट दिले आहेत. 

संपूर्ण देश आतुरतेने १ जूनची वाट पाहत असतो, कारण याच तारखेला भारतात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होते. यावर्षी मान्सून नेहमीच्या तारखेआधी म्हणजेच १ जून ऐवजी २६ मेच्या सुमारास येईल असे सांगण्यात आले होते. परंतु, आताच्या वातावरणातील बदलांच्या अभ्यासानुसार मान्सून येण्यास थोडा उशीर होऊ शकतो आणि तो येण्यास २ ते ४ जून उजाडू शकतो; म्हणजेच नेहमीपेक्षा १ ते ३ दिवस उशिराने येण्याचा अंदाज आहे.

मान्सून अडखळला, वातावरणात काय बदल झाले?
सुरूवातीला वातावरण मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वाटत होते. पण, समुद्राचे तापमान, वार्‍याचा वेग आणि हवेचा दाब यांसारख्या अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींवर मान्सून अवलंबून असतो आणि या गोष्टी काही प्रत्येक दिवशी बदलू शकतात. नेमके हेच आता घडले आहे. सोमवारी (२५ मे) मान्सून दाखल झाला आहे, हे जाहीर करण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण झालेले नव्हते. 

तीन महत्त्वाच्या गोष्टी जुळून आल्यावर हवामान विभागाकडून मान्सूनची घोषणा केली जाते. म्हणजेच काय तर केरळमधील १४ निश्चित हवामान केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस २.५ मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस नोंदवला गेला पाहिजे. त्याचबरोबर वार्‍याचा वेग आणि ढगांची स्थितीही ठराविक नियमांनुसार असायला हवी. यापैकी एकही गोष्ट अजून पूर्ण झालेली नाही, ज्याचा अर्थ असा की मान्सून अजूनही मागेच अडखळला आहे.

हवामान विभागाने काय म्हटले आहे?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून १६ मे रोजी आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, नैऋत्य आणि आग्नेय बंगाल उपसागर, अंदमान समुद्राचा बराचसा भाग, संपूर्ण निकोबार बेटे आणि श्री विजया पुरमसह अंदमान बेटांच्या काही भागात पुढे सरकला आहे.

१५ आणि १६ मे दरम्यान मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण झाले होते, कारण निकोबार बेटे आणि अंदमान बेटांच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्याचबरोबर या भागात पश्चिमेकडून येणार्‍या वार्‍यांचा वेग वाढून तो ताशी ३५ ते ४५ किलोमीटरपर्यंत पोहोचला होता. हे पश्चिमी वारे समुद्राच्या सपाटीपासून तब्बल ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत वाहत होते.

या भागात आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशनचे प्रमाण २०० / पेक्षा कमी होते, ज्याचा अर्थ असा की तिथे पावसाचे ढग सतत जमा होत होते. त्यानंतर, १८ मे रोजी मान्सून आणखी पुढे सरकला. तो आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, कोमोरीन क्षेत्राचा काही भाग, नैऋत्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पोहोचला आहे.