औरंगाबाद: संपुर्ण औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली असून जिल्हा परिषदेच्या वतीने तब्बल ७४७ गावे व २७५ वाड्यांमध्ये १०९१ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यासाठी ५०४ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई आहे तेथे १४२औरंगाबाद गावे व ३९ वाड्यांना २०२ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
त्या खालोखाल सिल्लोड तालुक्यातील ९४ गावे व ९० वाड्यांना १८३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गंगापुर तालुक्यात १७२ टँकरद्वारे १४० गावे व ४५ वाड्यातील २ लाख ५७ हजार १६५ ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. वैजापुर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तेथील ११९ गावे व २३ वाड्यातील १ लाख ४३ हजार ८७२ ग्रामस्थांना १६७ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. पैठण शहराच्या उशाशी जायकवाडी प्रकल्पातून नांदेडपर्यंत पाणी पुरविले जाते. परंतु याच तालुक्यातील ९८ गावे व २४ वाड्यातील २ लाख १३ हजार ३४५ ग्रामस्थ तहानलेले आहेत त्यांना १३८ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.
खुलताबादेतील ३१ गावे व ९ वाड्यांना ४४ टँकरद्वारे तर कन्नड तालुक्यातील ५३ गावे व ४३ वाड्यातील ग्रामस्थांना ७३ टँकरद्वारे पाणी दिले जाते. फुलंब्री तालुकाही दुष्काळाच्या झळा सोसतो आहे तेथील ६५ गावे व २ वाड्यामध्ये १०२ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाणी टंचाई असलेल्या सोयगाव तालुक्यातील केवळ ५गावांना १० टँकरने पाणी दिले जात आहे.