माय-लेकाचा केला निघृण खून १४ महिन्यांच्या बालकाला नदीत जिवंत फेकले

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पैशांच्या वादातून २६ वर्षीय महिला आणि तिच्या १४ महिन्यांच्या बालकाचे अपहरण करून त्यांची निघृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खून आणि पुराव्या नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायमा सलमान चौधरी (वय २६) आणि साजीम सलमान चौधरी (वय १४ महिने, दोन्ही रा. साजापूर) अशी मृत माय-लेकांची नावे आहेत.
याप्रकरणी अब्दुल लतीफ युनूस चौधरी (वय ४८, रा. साजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाचा आरोपी नूरजमा अहमद चौधरी (मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. पुणे) आणि त्याचा मित्र सद्दाम उर्फ आमीर अहमद चौधरी (रा. साजापूर) यांनी फिर्यादीच्या मुलीकडून घेतलेले पैसे परत देण्याच्या बहाण्याने १ एप्रिल २०२६ रोजी
सायमा व तिच्या मुलाला साजापूर येथील घरातून पळवून नेले. छत्रपती संभाजीनगर ते नाशिक प्रवासादरम्यान, आरोपींनी सायमाचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कणकोरी शिवारातील एका विहिरीत फेकून दिला. तसेच, पुरावा नष्ट करण्यासाठी सायमाचा १४ महिन्यांचा मुलगा साजीम याला पुणे परिसरातील एका नदीच्या वाहत्या पाण्यात जिवंत फेकून देऊन त्याचाही खून केला. याप्रकरणी १६ जुलै रोजी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस निरीक्षक संदीप राजपूत आणि पोलीस उपनिरीक्षक काकड यांनी तपास सुरू केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप राजपूत करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions