नळांना मीटर लावण्याच्या हालचाली; महापालिका राबवणार निविदा प्रक्रिया

Foto

संभाजीनगर, छत्रपती (सांजवार्ता ब्युरो): शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्याने महानगरपालिकेने नळांना मीटर लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मीटरचा ५१४ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. मात्र, त्यात सुधारणा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मीटरच्या खर्चाचा बोजा महापालिका व सामान्य नागरिकांवर पडू नये, यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्य सचिव राजेंश अग्रवाल यांनी आयुक्त अमोल येडगे यांना दिले. त्यानुसार आता येत्या आठवड्यात सुधारित प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे.
नव्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. या योजनेत शहरात २४ तास ७ दिवस पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यात नळाला मीटर बसविणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेने वॉटर मीटर बसविण्यासाठी शासनाला ५१४ कोटी खर्वांचा डीपीआर तयार करून शासनाला सादर केला आहे. या प्रस्तावावर मुख्य सचिव अग्रवाल यांच्याकडे नुकतीच बैठक झाली. त्यात वॉटर मीटरच्या प्रस्तावावर चर्चा झाली. महापालिकेवर मीटरच्या खर्चाचा बोजा पडू नये, ही खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली. सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्दे श त्यांनी दिले.
https://epaper.sanjwarta. Powered By: Vrudhee Solutions