मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील ५ रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान या रिक्त जागा भरण्या संदर्भात आता हालचालींना वेग आले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींना यात प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ५ जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधान परिषदेत एकुण ७८ सदस्य संख्या आहे. त्यापैकी ५५ सदस्य सध्या आहेत तर २३ जागा रिक्त आहेत. यापैकी १४ मे २०२६ ला विधान परिषदेच्या आणखी ९ जागा रिक्त होत आहेत. या ९ ही जागा विधानसभा सदस्य यांच्यातून निवडून आलेल्या आहेत. त्यापैकी उद्धव ठाकरे, निलम गोर्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुदत १३ मे रोजी संपत आहे. सध्या विधानसभेत २८६ आमदार आहेत त्यामुळे ३६ आमदारांच्या मतदानाचा कोठा ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील ५ रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींना यात प्राधान्य दिले जाण्याची माहिती आहे.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची रचना
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या ७८ इतकी आहे. विधानसभेप्रमाणं परिषद दर ५ वर्षांनी भंग होत नाही. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. ७८ सदस्यांपैकी ३० सदस्य विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदानाद्वारे निवडून दिले जातात. तर, शिक्षकांमधून ७ आमदार, पदवीधरांमधून ७ आमदार निवडले जातात. तर, राज्यपाल साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक सेवा यातून १२ आमदारांची नियुक्ती करतात.
काय आहे राज्यसभेच गणित?
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण ७ जागा २ एप्रिल २०२६ मध्ये रिक्त होणार आहेत.
कोणत्या जागा रिक्त होणार आहेत?
शरद पवार, राष्ट्रवादी, (एसपी)
रामदास आठवले ( भाजपच्या कोट्यातून आरपीआय आठवले गट)
भागवत कराड, भाजप
धैर्यशील पाटील, भाजप
प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना (युबीटी)
रजनी पाटील, काँग्रेस
फौजीया खान, राष्ट्रवादी (एसपी)