छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) अत्यंत गजबजलेल्या जालना रोडवरील हायकोर्ट चौकात मंगळवारी (दि. २७) सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास 'बर्निंग कार'चा अंगावर काटा आणणारा थरार पाहायला मिळाला. सिडको चौकाकडून सेव्हनहिलच्या दिशेने जाणाऱ्या एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीचा भडका उडून कारचा समोरील टायर मोठ्या आवाजासह फुटल्याने परिसरात एकच घबराट पसरली आणि नागरिकांची पळापळ झाली
जालना रोडवर कारच्या (क्र. एमएच-२०-बीएन-३६२२) इंजिनने अचानक पेट घेतला. ही माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनात सिडको अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, उपकेंद्र अधिकारी संजय कुलकर्णी, ड्युटी अधिकारी मुस्ताक तडवी, अग्निशामक जवान बाबासाहेब ताठे, विलास झरे, दिनेश वेलदोडे आणि चालक बाबासाहेब गव्हाड यांनी तातडीने बंबासह घटनास्थळी धाव घेतली.
तर वाहतूक पोलिसांनी सिडकोकडून येणारी वाहने सुरक्षित अंतरावर रोखून धरल्याने पुढील अनर्थ टळला. सिडको अग्निशमन केंद्राला सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी आगीचा कॉल मिळताच अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी रवाना झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे इंजिन आणि दर्शनी भाग पूर्णपणे जळून खाक झाला.
प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे इंजिनने पेट घेतला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















