नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची; राज ठाकरे याचा मनसैनिकांना आदेश

Foto
मुंबई : यंदाची निवडणूक ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे संकट ओळखा. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे. त्यामुळे सगळे मतभेद बाजुला सारुन निवडणुकीत झोकून देऊन काम करा, असा कानमंत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासून राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मनसेकडून (चछड) अद्याप आपल्या एकही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मनसेने आपल्या उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म देऊन त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही सगळी लगबग सुरु असताना राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबईत जिंकायचीच आहे, असे ठणकावून सांगितले.

कुणाला किती जागा मिळाल्या, यामुळे नाराज होऊ नका. स्वार्थ मराठी माणसाच्या हितापुढे शुल्लक आहे. कुणाच्या व्यक्तिक स्वार्थाकडे पाहू नका. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आहे. दुसर्‍यांचे स्वप्न गाडण्यासाठी एकत्र व्हा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले. काही लोकांना मुंबई हातात घ्यायची आहे. त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करणं, हा आपला उद्देश आहे. इतकी वर्षे आपण सत्तेविना राहिलो पण आपल्या पक्षाचा दबदबा कमी झालेला नाही. आज भाजपकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम आहे, या जीवावर ते माज करत आहेत. अशाप्रकारे सत्तेविना राहण्याचे प्रसंग देशाच्या इतिहासात अनेकदा आले आहेत. अनेकांना वाटतं की भाजपमध्ये गेलं तर फायदा होईल. पण भाजपमधील लोकांवर टांगती तलवार आहे. ही सगळी बसवलेली माणसं आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. 

निवडणुकीच्या प्रचारसभेत मी अनेक गोष्टी काढणार आहे. कोणाला किती जागा मिळाल्या, यामुळे नाराज होऊ नका. मराठी माणसाच्या हितापुढे वैयक्तिक स्वार्थ क्षुल्लक आहे. मुंबई वाचवायची जबाबदारी आपली आहे. आज-उद्या उमेदवारी अर्ज भरले जातील, तेव्हा सगळ्यांनी जल्लोष करा. आपल्याला युतीचा धर्म पाळायचा आहे. रात्र वैर्‍याची आहे. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मुंबई हातात राखायची आहे, असे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितले.