ऑपरेशन टायगरमुळे राडा होऊ नये म्हणून मुंबई पोलिस अलर्ट मोडवर

Foto
मुंबई: शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन आणि उद्धवसेनेचे काही खासदार शिंदेसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या हेतूने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासह आवश्यक त्या उपाययोजना करत, विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश विशेष शाखेने सर्व पोलिस उपायुक्ताना दिले आहे.

सध्या मुंबईतील अनेक चौकात उद्धव सेना आणि शिंदे सेनेचे बॅनरवॉर दिसत आहे. खासदार फुटीनंतर दोन्ही सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. त्यातून मोठा राडा होण्याची शक्यता आहे. हिंसक स्थिती निपटण्यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. अनेक चौका चौकात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी पोलीस तैनात आहेत. प्रत्येक घटनेवर पोलीस लक्ष ठेवत आहेत. खास करून सभेच्या ठिकाणी आणि परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. विशेष शाखेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, उद्धवसेनेतील सहा खासदार दिल्ली येथे गेले असून त्यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत ऑपरेशन टायगर या नावाने प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या घडामोडींवर दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया उमटत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

१९ जून रोजी शुक्रवारी उद्धवसेनाआणि शिंदेसेनेचा वर्धापनदिन अनुक्रमे माटुंग्यातील षण्मुखानंद, गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित केला आहे. राज्यभरातून दोन्ही गटांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शिंदेसेनेच्या नेस्को येथील वर्धापनदिनाच्या सोहळ्यात संबंधित खासदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

नेत्यांच्या हालचालींवर लक्ष
अपर पोलीस आयुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रवीण मुंढे यांनी सर्व संबंधित अधिकार्‍यांना दोन्ही गटांतील आक्रमक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्याचे, त्यांच्या प्रतिक्रिया आणि हालचालींचे निरीक्षण करण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तणावाची शक्यता वाढली
उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नेस्को येथील कार्यक्रमादरम्यान अचानक निषेध आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त आहे. तसेच शिंदेसेनेतील अन्य मंत्र्यांच्या दौर्‍यांदरम्यानही निषेधात्मक आंदोलने होऊ शकतात, असा अंदाज पोलिसांचा आहे. शिंदे गटाकडून संभाव्य पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव साजरा केला जाऊ शकतो. त्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन  तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश आहेत.