छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : समर्थनगर भागातील इतिहासकालीन बारव (जुनी पाण्याची विहीर) लगत असलेल्या अंदाजे ३० बाय ३० आकाराच्या जागेत पत्र्याचे शेड ठोकून काही लोकांनी कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आल्याने, सोमवारी (दि.१६) मनपाच्या पथकाने कारवाई करून अतिक्रमण हटविले. विशेष म्हणजे या जागेसाठी महावितरणकडून वीज मिटर देऊन कनेक्शनही दिल्याचे कारवाईदरम्यान निदर्शनास आले. या कारवाईमुळे समर्थनगरातील कोट्यवधी रुपयांचा प्लॉट हडपण्याचा प्रयत्न मनपाच्या पथकाने हाणून पाडला.
जुन्या बारवलगत रिकामी जागा असून, या जागेवर काही लोकांनी पत्र्याचे शेड ठोकण्यात आल्याचे सहायक आयुक्त व अतिक्रमण निरीक्षकांच्या निदर्शनास आले होते. शेडमध्ये ये-जा करण्यासाठी पत्र्यांचाच दरवाजा करून समोरून कुलूप लावण्यात आले होते. त्या ठिकाणी कोणाचाही संपर्क क्रमांक किंवा पत्ता लावण्यात आला नव्हता. या अतिक्रमणाबाबत मागील तीन-चार दिवसांपासून माहिती घेण्याचा प्रयत्न मनपाच्या पथकाकडून सुरू होता. याबाबत सोमवारी मनपा आयुक्त जी. श्रीकांत व अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांना झोन क्र. २ चे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे यांनी सविस्तर माहिती दिली. वरिष्ठांनी त्यांना अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले. सहाय्यक आयुक्त मोरे, शेख रफिक, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद यांच्यासह पथकाने जाऊन कारवाई केली. अनोळखी व्यक्तीने दर्शनी भागात निळ्या रंगाचे पत्रे लावले होते, त्याला एक गेटही तयार करून कुलूप लावले होते. तसेच आतमध्ये लोखंडी तुटलेले किरकोळ सामानही पडलेले होते, हे सर्व अतिक्रमण काढण्यात आले, अशी माहिती सहाय्यक आयुक्त मोरे यांनी दिली.









