छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महापालिकेत साडे पाच वर्षे प्रशासकांनाच सर्व अधिकार असल्याने विभागप्रमुखांकडून प्रस्ताव आणि ठराव एकत्रच मागविले जात असत. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेचे सर्व अधिकार प्रशासकांनाच असल्याने ते त्यास मंजुरी देत होते. जानेवारी महिन्यात निवडणूक होऊन, ११५ नगरसेवक निवडून आले. यातून महापौर, उपमहापौरांची निवड झाली. आता नगरसेवकांमधूनच स्थायी समिती सदस्य आणि विषय समिती सदस्यांची निवड होणार आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या स्थायी समितीत असतात. महापालिकेच्या आर्थिक व्यवहारावर हि समिती नियंत्रण ठेवते. मनपाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार स्थायी समितीला आहे.
सन २०२५-२६ या वर्षाचा सुधारीत व सन २०२६-२७ या वर्षाचे मुळ अंदाजपत्रक तयार करून त्यास मंजूरी देत सर्वसाधारण सभेकडे अंतिम मंजूरीसाठी सादर करावा केला जातो. अर्थसंकल्पाची सर्वसाधारण सभा मार्च महिन्यात होईल. स्थायी समितीसह शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि शहर सुधार समिती निवडावी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही विशेष सभा घेण्यात येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
पक्षनिहाय सदस्यसंख्या अशी
महापालिकेतील एकूण १ नगरसेवकांची संख्या ११५ आहे. तर स्थायी समितीवर १६ सदस्य निवडायचे आहेत. त्यामुळे ११५ ला १६ ने भागितल्यास ७. १८ उत्तर येते. प्रत्येक राजकीय पक्षाच्या ७.१८ सदस्यांमागे १ सदस्य हा स्थायी समितीवर निवडला जाईल. त्यानुसार भाजपचे ५७ नगरसेवक असून यातील ८ सदस्य स्थायी समितीवर निवडले जातील. एमआयएमच्या ३३ नगरसेवकांमधून ५, शिवसेना शिंदे गटाच्या १३ नगरसेवकांमधून २ आणि शिवसेना उबाठाच्या ६ नगर सेवकांमधून १ नगरसेवकाची स्थायी समितीत निवड होईल., अशी माहिती सूत्रांनी दिली.












