सातारा-देवळाई परिसरातील भूमाफियांना दणका; ५ बांधकामेही उद्ध्वस्त
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सोलापूर-धुळे महामार्गालगत सातारा-देवळाईतील साईटेकडी परिसरात मनपाने बुधवारी मोठी कारवाई केली. गट नंबर ४८ ते ६० मधील सुमारे ९०० एकर जागेवर अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात बुलडोझर फिरवण्यात आला. अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या माहितीनुसार, येथे प्लॉट विक्रीची कार्यालये आणि सुमारे ८४० प्लॉटची मार्किंग उद्ध्वस्त करण्यात आली. यासोबतच वनविभागाच्या जमिनीवर उभारलेली ५ पक्की बांधकामेही पाडण्यात आली.
चार भूमाफियांवर गुन्हा
या भागातील नागरिकांनी अनधिकृत प्लॉटिंगबाबत तक्रार केली होती. चौकशीत ही जागा काहीशी खासगी आणि बहुतांश वनविभाग व सरकारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कारवाई करताना प्लॉट विक्रेत्यांच्या ५ कार्यालयांसह पक्की बांधकामे पाडली. सुमारे ८४० प्लॉटची मार्किंगही उध्वस्त केली. याप्रकरणी १९३ जणांना नोटीस बजावण्यात आल्या असून, ४ भूमाफियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे वाहुळे यांनी सांगितले.
६०० चा प्लॉट साडेसात लाखात
गट नंबर ६० मध्ये जय शंकर डेव्हलपर्सने १६२ प्लॉट लेआऊट केले आहे. ६०० चौ.मी.चा प्लॉट ५ ते ७.५० लाख, तर ९०० चौ. मी. चा प्लॉट ८ ते १० लाख रुपयांना विक्री झाला. खरेदी केलेल्या अनेक नागरिकांनी हप्त्याने प्लॉट खरेदी केले आहेत. प्लॉटची गुंठेवारी होण्याचे आश्वासनही प्लॉट विक्रेत्याने दिल्याची माहिती समोर आली आहे.
प्लॉट बाँडवर विक्री : सर्व प्लॉट बॉण्डवर विक्री करण्यात आलेले आहेत.
गट नंबर ५४-६० मधील शंभर एकरावर प्लॉटिंग केलेली असून, ६०० व ९०० चौ. मी. चे प्लॉट मार्किंग केले होते. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा विनापरवाना ले-आऊटमध्ये प्लॉट खरेदी करू नये, खरेदीपूर्वी कागदपत्रांबाबत मनपाकडे चौकशी करून खात्री करून घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













